विकासाच्या दृष्टीने रस्त्यांचे फार महत्व असल्यामुळे जिल्ह्य़ातील सर्व रस्त्यांच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या वर्षांत २७२ कोटींचा निधी जिल्ह्य़ातील रस्त्यांसाठी देण्यात आले आहेत. जिल्ह्य़ातील रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी पैशाची कमतरता भासणार नाही, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मूल तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या हस्ते पूल व रस्त्यांचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले, जिल्हा परिषद सदस्या वर्षां परचाके, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल यांच्यासह त्या त्या गावचे सरपंच, उपसरपंच व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गेल्या चार वर्षांत जिल्ह्य़ातील रस्त्यांसाठी २०० कोटी रुपये आणि राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या वष्रेभरात २७२ कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने जिल्ह्य़ातील सर्व रस्ते पूर्ण होतील. यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. रस्ते व विकासाच्या अन्य बाबतीत मूल तालुका मागे राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांशी झालेल्या भेटीत बल्लारपूर मतदारसंघ हागणदारी मुक्त करण्याचे आश्वासन मी दिले आहे. हा मतदारसंघ देशातील पहिला हागणदारी मुक्त मतदारसंघ ठरणार आहे. मतदारसंघातील जनतेच्या विश्वासावरच हे आश्वासन दिले आहे. यासाठी गावांनी समोर यावे, असेही आवाहन त्यांनी केले. पाच वर्षांपर्यंत खऱ्या अर्थाने बालकांच्या बुध्दीमत्तेचा विकास होतो. या वयात त्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास ते भविष्यात फार समोर जाऊ शकतात, त्यामुळेच स्मार्ट अंगणवाडीचा उपक्रम मतदारसंघात राबविण्यात येणार असून विविध शैक्षणिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा देण्याला प्राधान्य आहे, त्यामुळेच मामा तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम, जलयुक्त शिवार आदी कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. तसेच वनयुक्त शिवार ही संकल्पना राबविली जाणार असून या अंतर्गत १५६ प्रकारची वृक्षसंपदा तीन वर्षांत गावखेडय़ात निर्माण केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध रस्ते व पुलांमध्ये नागपूर-मूल-खेडी-गोंडपिंपरी येथील मार्गावरील गांगलवाडीजवळील १ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पुलाचा समावेश आहे. बोरचांदली येथील मूल-चामोर्शी रस्त्याची ३ कोटी रुपये खर्च करून सुधारणा करणे, मूल-मारोडा-सोमनाथ रस्त्याचे १ कोटी खर्च करून रुंदीकरण व डांबरीकरण, पेअगाव-घाटुर्नी-मारोडा-मूल-भेजगाव रस्त्याच्या नदीवरील १० कोटी रुपये खर्चाचा मोठा पूल, सुशी ते उथळपेठ रस्त्याचे ५० लाख रुपये खर्चाचे मजबुतीकरण व डांबरीकरण, कोळसा-झरी-पिंपळखुटा-नंदगूर-अजयपूर-केळझर-चिरोली-ताडाली रस्त्याचे १ कोटी ९० लाख रुपये खर्चाचे मजबुतीकरण व डांबरीकरण या कामांचा समावेश आहे