कृष्णा सहकारी साखर कारखान्यात सहकार पॅनेलचा विजय म्हणजे अधिका-यांनी दिलेला विजय आहे. प्रत्येक गटात ७०० ते ७५० मते बाद होतात, ही न पटणारी बाब आहे. याबाबत फेरमतमोणीची मागणी करूनही निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांनी ती फेटाळली. हा तर लोकशाहीचा खून आहे. म्हणून त्यांच्यावरती फौजदारी दाखल करणार असून, फेरमतमोजणीसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी दिली. यावेळी शेकाप नेते अॅड. रवींद्र पवार, कृषिमित्र अशोकराव थोरात उपस्थित होते.
‘कृष्णा’च्या निवडणूक निकालावर बोलताना, मोहिते म्हणाले, की फुकट साखर देणा-यांना आमच्या शुभेच्छा आहेत. सभासदांच्या हितासाठी ते जे निर्णय घेतील त्याला आम्ही पाठिंबाच देऊ पण शेतकरी हिताविरोधात काही निर्णय घेतल्यास त्याला तेवढय़ाच ताकदीने विरोध करू.
डॉ. सुरेश भोसले यांनी राज्यातील भाजप सरकारच्या सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा खून चालवला आहे अशी टीकाही यावेळी केली. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी मंगळवारी (दि. २३) झाली. त्यात सहकार पॅनेल १५ जागा जिंकून काठावरती विजयी झाले. हा विजय आम्हाला मान्य नाही.
अशोक थोरात म्हणाले, की सर्वसाधारणपणे साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी काम पाहतात. ‘कृष्णा’च्या निवडणुकीतही प्रांताधिका-यांची निवड झाली असताना निवडणूक निर्णय अधिकारीच बदलण्यात आला. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच पारदर्शी झालेली दिसत नाही. मतमोजणी प्रक्रियेतही भोंगळपणा आढळून आला. मोठय़ा प्रमाणात मते अवैद्य ठरताना, संस्थापक पॅनेलचे ७ उमेदवार केवळ ११ ते १०० मतांनी पराभूत झाले. अवैध मतांची जरी फेरमोजणी केली तरी निकाल बदलू शकतो. मात्र, फेरमतमोजणीला निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांनी नकार दिला. ही बाब चुकीची आहे. म्हणून आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. लोकशाहीचा खून करून सत्ता भोगायची ही तर भोसलेंची जुनीच पध्दत आहे. १३ हजार ५८२ सभासदांची मते पेटीबंद ठेवून न्यायालयीन लढाई करत ६ वष्रे सत्ता त्यांनी यापूर्वीही एकदा भोगली आहे. आताही त्यांचा तोच डाव आहे. पण जनआंदोलन व न्यायालयाच्या मार्गाने तो आम्ही उलथवून टाकू असे त्यांनी सांगितले.