सांगली मतदार संघात चुरशीने झालेल्या निवडणुकीत सुमारे ६० टक्के मतदारांनी आपल्या पवित्र हक्क बजावला.  या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रतीक पाटील व महायुतीचे संजयकाका पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केला.
मतदारांनी प्रामाणिपणे काम करणा-या व केवळ वारस नसून कामातही सरस असल्याचे या मतदानाच्या माध्यमातून सांगितले असून जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी मतदार पुन्हा आपल्यालाच संधी देतील, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीत वैयक्तिक दोषारोप अथवा टीका टिप्पणी न करता आपण गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखा-जोखा मतदारांपुढे मांडला. त्यामुळेच मतदार आपल्याला पुन्हा संधी देतील असा विश्वास वाटतो असेही प्रतीक पाटील यांनी सांगितले.
दरम्यान निष्क्रिय खासदार असल्याची टीका मी केलेली नसून जनतेची ती प्रतिक्रिया होती तिच प्रतिक्रिया मतदानाच्या माध्यमातून उमटेल आणि मोदींच्या लाटेमुळे सांगली मतदार संघातही परिवर्तन अटळ असल्याचा दावा भाजपाचे संजयकाका पाटील यांनी केला. आपल्याला या निवडणुकीत युवा वर्गाला परिवर्तन हवे असल्याचे पूर्णपणे जाणवले. हा युवा मतदारच परिवर्तनाच्या लाटेत किमया घडवू शकेल या निवडणुकीत राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अवास्तव महत्त्व दिल्याने संघर्ष अटळ ठरला. महायुतीचा विजय होणार असल्याने गृहमंत्री राजीनाम्याची तयारी ठेवावी, असेही संजयकाका पाटील यांनी सांगितले.