औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी होणार की नाही, याचा निर्णय सोमवापर्यंत (दि. ६) म्हणजे नामनिर्देशनपत्र दाखल होण्याच्या अंतिम दिवसाच्या एक दिवस आधी होईल. स्वतंत्र निवडणूक लढविण्याची मागणी आमच्याही पक्षात होत असली तरी आघाडी व्हावी, अशीच आमची मानसिकता आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी येथे पत्रकार बैठकीत पक्षाची भूमिका मांडली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे आम्ही आघाडीबाबत रितसर प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्या निरोपाची आम्ही वाट पाहत आहोत. सोमवापर्यंत वाट पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कोणत्या वॉर्डात व किती जागा लढविणार, तसेच विधानसभेच्या उपाध्यक्ष निवडीबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय, हे सांगण्याचे मात्र तटकरे यांनी सफाईने टाळले.
‘स्वतंत्र गृहमंत्री नेमूनही फरक पडणार नाही’
दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते असतानाही राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे. त्यामुळे स्वतंत्र गृहमंत्री नेमूनही स्थितीत फार फरक पडेल असे वाटत नाही. राज्याच्या प्रमुखाचाच वचक राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्र्याचा तरी कसा राहील, असा सवालही तटकरे यांनी विचारला.