अशक्य अटी घातल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करणे अवघड असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी स्पष्ट केले. महायुतीप्रमाणेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधीलही जागावाटपाचा तिढा सुटलेला नसून, आघाडीचा पेच अद्याप कायम आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना अद्याप आघाडीच्या जागावाटपाची घोषणा झालेली नाही. जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव टाकण्याचे काम करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाले, जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास कॉंग्रेस उत्सुक आहे. पण जर अशक्य अटी घालण्यात आल्यास आघाडी करणे अवघड होईल. जर कोणत्याही अटींशिवाय चर्चा झाली असती, तर आत्तापर्यंत सर्व प्रश्नांवर तोडगा निघाला असता. कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पुन्हा सत्तेत आल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली आहे का, यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.