मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरच्या मैदानावरील उमेदवारांमुळे आघाडी नेत्यांच्या सत्त्वपरीक्षेस उतरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नेते व कार्यकर्त्यांमधील उदासीनता, तडजोडीचे राजकारण अन् अंतर्गत कलह या कारणांनी बालेकिल्ल्यात काँग्रेस आघाडीला पुन्हा पराभवास सामोरे जावे लागले. मोदीलाटेच्या पाश्र्वभूमीवर आघाडी सांघिक यश मिळवून विधानसभेसाठी ‘हम कुछ कम नही’ असेच दाखवून देईल असे वाटत असताना, आघाडीतील दमच निघाल्याचे म्हणावे लागत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातील शरद पवारांचे उमेदवार व सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील हे थोडक्या मताने हरले. प्रतिष्ठेच्या या जागेवर भाजपचे चंद्रकांतदादा पाटील यांनाच पुन्हा संधी मिळाली. सारंग पाटलांचा २ हजार ३८० मतांनी पराभव झाला. तर, राष्ट्रवादीचे बंडखोर अरूण लाड यांनी ३७ हजारांवर खेचलेली मते पाहता अरूण लाड यांची बंडखोरी सारंग पाटलांच्या पराभवास प्रमुख कारण ठरले आहे. अरूण लाड यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता होती. आघाडीमधील उदासीनता, तडजोडीचे राजकारण आणि अंतर्गत कलह अधिकृत उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरले. आघाडीच्या काही नेत्यांनी अरूण लाड यांची पाठराखण केल्यानेच त्यांनी मोठे मतदान मिळवल्याचे मानले जात आहे. अनेक ठिकाणी ताकदीच्या लोकप्रतिनिधींनी सारंग पाटलांच्या पराभवास हातभार लावल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पदवीधरप्रमाणे शिक्षक मतदारासंघातही काँग्रेसचे उमेदवार प्राचार्य, डॉ. मोहन राजमाने यांना फटका बसला. पुणे शिक्षक मतदार संघातील डॉ. पतंगराव कदम समर्थक, डॉ. मोहन राजमाने यांना दुसऱ्यांदा दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. या जागेवर शिक्षक कृती समितीचे दत्तात्रय सावंत यांना विजय मिळाला.  पतंगरावांच्या सर्वच विरोधकांनी राजमानेंना पडद्याआडून सक्त विरोध केल्यानेच राजमानेंच्या नशिबी पुन्हा पराभव आल्याचे जानकारांचे म्हणणे आहे. विधानसभेच्या तोंडावर थोडक्या मतांनी उमेदवारांचा पराभव झाल्याने निवडणुकीत जे ‘घडलं बिघडलं’ याचा लेखाजोखा आघाडी नेतृत्वाने तपासणे त्यांच्यासाठी हिताचे ठरणार आहे.