News Flash

राजभवनातील मशीद नमाजासाठी खुली करा; रझा अकादमीचं राज्यपालांना पत्र

राजभवनात मशीद नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. (संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

राज्यातील प्रार्थनास्थळे दिवाळीमध्ये उघडण्यात आली. सातत्यानं मागणी होत असल्यानं राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यात आल्यानंतर रझा अकादमीने राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची मागणी केली आहे. रझा अकादमीनं यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र दिलं आहे. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबद्दल वृत्त दिलं आहे. तर राजभवनानं या प्रकरणी भाष्य करण्यास नकार दिला आहे. राजभवनामध्ये कोणतीही मशीद नसल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तात म्हटलं आहे. मात्र, मुस्लीम कर्मचाऱ्यांना नमाज पठण करता यावं म्हणून स्टाफ क्वार्टरमधील एक रुम उघडी करून देण्यात आलेली होती. त्यामुळे बाहेरून येणारे इतर सामान्य लोकही या ठिकाणी नमाज पठण करायचे. त्यामुळे या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढायला लागली होती. शुक्रवारी बाहेरील लोक येथे नमाजासाठी यायचे. परंतु, करोनाच्या काळात गर्दी वाढत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

रझा अकादमीचे महासचिव एम. सईद नुरी यांनी राज्यपालांना हे पत्र लिहिलं आहे. देशात सगळीकडे धार्मिक स्थळ खुली करण्यात आलेली असताना राजभवनातील कर्मचाऱ्यांना मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ पाच ते सात लोकांना नमाजसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. आमची विनंती आहे की तात्काळ आदेश काढून कर्मचाऱ्यांना करोनापूर्वीप्रमाणेच नमाज पठण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असं राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

२३ मार्चपासून राज्यातील सर्वच धार्मिकस्थळं बंद होती. १६ नोव्हेंबर रोजी पुन्हा धार्मिकस्थळं सुरू करण्यात आली. त्यामुळे रझा अकादमीचे महासचिव सईद नुरी यांनी राज्यपालांना एक पत्रं लिहून राजभवनातील मशीद नमाज पठणासाठी सुरु करण्याची विनंती केली आहे. सर्वच धार्मिकस्थळांच्या समित्या व संस्थानांनी करोना नियमाचं काटेकोर पालन करण्यावर भर दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 12:06 pm

Web Title: allow citizens to pray at mosque in raj bhavan raza academy to maharashtra governor bmh 90
Next Stories
1 रोहित पवार म्हणतात, ‘या’ व्यक्तीसोबत लाँग ड्राइव्हला जायला आवडेल
2 विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही; राज्यमंत्री तनपुरे यांची माहिती
3 पंतप्रधानांनी एवढं सांगितलं तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल; संजय राऊत यांचा सल्ला
Just Now!
X