पालघरमधील रिक्षाचालक-मालक संघटनेची मागणी

पालघर : टाळेबंदीतील नियम शिथिल केले जात असताना, तसेच  महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आल्याने  पालघर रेल्वेस्थानक आवारातील रिक्षातळ सुरू करण्याची मागणी रिक्षाचालक-मालक संघटनांनी केली आहे.शहरातील अनेक उद्योग आणि व्यापार पूर्ववत होत आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. तरीही रेल्वे स्थानक आवारात रिक्षा उभ्या करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे तीन व सहा आसनी रिक्षा स्थानकाबाहेरील जागेत उभ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

रिक्षाचा व्यवसाय हा प्रामुख्याने बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर अवलंबून आहे. त्यामुळे स्थानक आवारात सुरक्षित अंतराचे नियम पाळून रिक्षांना पूर्वीच्या जागेत परवानगी मिळावी, यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे पालघर येथील रिक्षाचालक-मालक संघाचे अध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले. विरार, सफाळे, पालघर, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रेल्वे स्थानकाबाहेरील मोकळ्या जागेत रिक्षांना उभे राहण्याची परवानगी द्यावी, असेही संघटनेच्या वतीने मागणीत स्पष्ट करण्यात आले आहे.