|| प्रशांत देशमुख

वर्धा : तात्पुरत्या कोविड काळजीवाहू केंद्रासाठी उद्योगांना सामाजिक दायित्व निधी खर्च करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे. उद्योगांना सामाजिक दायित्व निधी स्थायी व अस्थायी स्वरूपाच्या सार्वजनिक कामासाठी खर्च करण्याची मुभा आहे. स्थायी स्वरूपाचे म्हणजे भवन वगैरे बांधकाम तर अस्थायी स्वरूपाचे म्हणजे खेळाडूंना मदत देण्यास्वरूपाची कामे असतात. आता देशासमोर करोनाचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी आर्थिक स्राोत कमी पडू नये म्हणून केंद्रीय वाणिज्य व्यवहार मंत्रालयाने सामाजिक दायित्व निधीसंदर्भात २२ एप्रिलला एक पत्रक काढून सूचना केली. यापूर्वी २२ मार्च २०२० ला असा निधी कोविड १९ साठी खर्च करण्याचे निर्देश होते. त्यात सुधारणा करीत नव्या आदेशानुसार असा निधी तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालय तसेच कोविड सुविधेसाठी देण्याबाबत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. कंपनी कायद्यात आरोग्य सुविधांना प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा तसेच आपत्कालीन व्यवस्थापनासाठी हा निधी खर्च करण्याची तरतूद असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे उपक्रम राज्य शासनाशी सल्लामसलत करून राबवले जाऊ शकतात, असे मंत्रालयाच्या सीएसआर सेलचे उपसंचालक शोभित श्रीवास्तव यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राजकीय पैलू

या घडामोडीकडे राजकीय पैलूनेही पाहिले जात आहे. आमदारांना त्यांचा निधी कोविडसाठी खर्च करण्याची मुभा मिळाली तर खासदारांचा निधी मात्र पीएम केअर फंडात वळवण्यात आला. उद्योगांचा निधी कोविड कार्यासाठी वळवण्याचे निर्देश आल्यानंतर खासदार चांगलेच सतर्क झाले. वर्धेचे खा. रामदास तडस यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या निधीच्या माध्यमातून जम्बो कोविड केंद्र उभारण्याबाबत आज चर्चा केली. तसेच अन्य खासदारांनीही फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे.