News Flash

अलमट्टी भरले, उजनी कोरडेच

कृष्णा खोऱ्याद्वारे कर्नाटकात महाराष्ट्रातून प्रचंड पाण्याचा ओघ

कृष्णा खोऱ्याद्वारे कर्नाटकात महाराष्ट्रातून प्रचंड पाण्याचा ओघ

कोल्हापूर व सांगली भागात यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्याद्वारे कर्नाटकात प्रचंड प्रमाणात वाहून गेलेल्या पाण्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरण शंभर टक्के भरले असताना इकडे सोलापूर जिल्ह्य़ातील उजनी धरण अद्यापि जवळपास कोरडेच राहिले आहे. अलमट्टी धरणात वाहून गेलेले सुमारे शंभर टीएमसी पाणी जर भीमा खोऱ्यात अडविले गेले असते तर तेच पाणी उजनी धरणात आले असते. त्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लागणे ही काळाची गरज असल्याचे मानले जात आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ांत कृष्णा खोऱ्यात पडणारे पावसाचे सुमारे ११५ टीएमसी एवढे अतिरिक्त पाणी पुढे कर्नाटकात वाहून जाते. यंदा कृष्णा खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात पाणी कर्नाटकातील अलमट्टी धरणात पोचले आहे. एवढेच नव्हे तर या जादा पाण्यामुळे अलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. कोल्हापूर व सांगली भागात मुसळधार पाऊस पडण्यापूर्वी अलमट्टी धरणात पाण्याचा साठा जेमतेम २२ टीएमसी इतकाच होता. परंतु, कृष्णा खोऱ्यातून वाहून गेलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे अलमट्टी धरणात आता तब्बल १२३ टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. हेच पाणी जर कृष्णा खोऱ्यातूुन भीमा खोऱ्यात वळविले गेले असते तर उजनी धरणाचे चित्र पालटले असते. सध्या उजनी धरणात केवळ वजा २९ टक्के एवढाच म्हणजे फक्त सुमारे ४५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाची सद्य:स्थिती पाहता ११७ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण भरण्याची शक्यता दुरापास्त आहे. गेल्या ३ जुलैपर्यंत उजनी धरणात फक्त वजा ५४ टक्के इतकाच पाणीसाठा होता. त्यानंतर आजतागायत पुणे जिल्ह्य़ात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरणात २५ टक्के पाणीसाठा वाढला आहे. ५३.७१ टीएमसी पाणीसाठा होईल तेव्हा धरणात उपयुक्त पाणीसाठा गृहीत धरला जातो. प्राप्त परिस्थितीत हे धरण उपयुक्त पाणीसाठय़ापर्यंत तरी मजल गाठू शकेल की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

तुटीच्या खोऱ्यातील उजनी धरणात नेहमीच पाण्याच्या साठय़ाची अवस्था वाइट असते. त्यातच धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन केले जात नसल्यामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक बनते.

सोलापूरसह पंढरपूर, अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा आदी लहान-मोठय़ा शहरांना पिण्याचे पाणी याच धरणातून सोडले जाते.आठ उपसा सिंचन योजना व एक भीमा-सीना जोडकालवा अशा नवीन नऊ योजना धरणांवर अवलंबून आहेत. जर धरणात पाणीच नसेल तर या नऊ नवीन योजना सुरू होणार कशा, हा प्रश्न सतावतो आहे. शिवाय शेजारच्या मराठवाडय़ाला याच धरणातून २५ टीएमसी पाणी द्यायचे आहे. त्यसाठी मराठवाडय़ात कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

योजना बासनात

या पाश्र्वभूमीवर कृष्णेतील पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त ११५ टीएमसी पाणी अडवून भीमा खोऱ्यात आणण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना १२ वर्षांपूर्वी मंजूर झाली खरी; परंतु नंतर ती अव्यवहार्य आहे म्हणून ही योजना बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे. ही योजना मार्गी लागल्यास सोलापूरसह शेजारच्या उस्मानाबाद, सांगली, सातारा व पुण्यातील मिळून ३३ तालुक्यांना पाणी मिळू शकते. यात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. याकामी राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे अद्यापि पाठपुरावा करीत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:03 am

Web Title: almatti dam filled hundred percent by water
Next Stories
1 मुरुडला दुर्मीळ काटेरी केंड मासा सापडला
2 सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण
3 कोपर्डीतील आरोपींची नार्को चाचणी होणार?
Just Now!
X