सांगली महापालिकेच्या प्रभाग समिती निवडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने स्वाभिमानी विकास आघाडी एकाकी पडली आहे. पाच समित्या काँग्रेसला व एक समिती राष्ट्रवादीला मिळाली असून सहापकी पाच समित्यांमध्ये महिलांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
    समिती क्र. १ साठी बाळासाहेब काकडे, ४ साठी श्रीमती मालन हुलवान यांची बिनविरोध फेरनिवड झाली असून मागासवर्गीस समितीच्या सभापतीपदी शेवंता वाघमारे आणि गुंठेवारी समितीच्या सभापतीपदी शालन चव्हाण यांची निवड झाली.
    प्रभाग समिती २ मध्ये चुरस अपेक्षित होती. या समितीत स्वाभिमानी ५, राष्ट्रवादी ७ आणि काँग्रेसचे १० असे मताधिक्य आहे. स्वाभिमानीने या समितीची मागणी केली होती. त्या बदल्यात प्रभाग तीन साठी दोन सदस्यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र यावेळी सभापती पदासाठी शकुंतला भोसले व अश्विनी खंडागळे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिल्याने श्रीमती भोसले विजयी झाल्या. स्वाभिमानीच्या स्वरदा केळकर या सभापती निवडीस गरहजर राहिल्या.
    महापालिकेत महापौरपदी श्रीमती कांचन कांबळे, प्रभाग २ च्या सभापती शकुंतला भोसले, प्रभाग ४ च्या मालन हुलवान, गुंठेवारी समितीच्या शालन चव्हाण तर मागासवर्गीय समितीच्या सभापती पदाची संधी शेवंता वाघमारे यांना मिळाली आहे. त्यामुळे महापालिकेत महिला राज अवतरले आहे.