भौगोलिक मानांकनामुळे स्वतंत्र ओळख 

फळांचा राजा हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने या मानांकनाची घोषणा केली. मानांकनामुळे हापूसची ओळख जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

रत्नागिरी, सिंधुर्दुग व लगतच्या परिसरातील हापूसला मिळालेले हे भौगोलिक मानांकन उत्पादनांवर वापरले जाणारे चिन्ह आहे. त्यानुसार त्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता त्याच्या मूळ भौगोलिक स्थानावरून ओळखली जाते. भौगोलिक मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूसची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.  केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहान विभागाने हापूस आंब्यास मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते.

या मानांकनामुळे कोकण आणि लगतच्या भागातील आंबे वगळता इतर कोणत्याही आंब्यांना हापूस असे संबोधता येता येणार नाही किंवा त्यांची विक्री करताना हापूस असा उल्लेख करता येणार नाही. याआधी हापूस आंबा म्हणून कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा गुजरातचा आंबाही सरसकट विकला जात होता. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती आणि कोकणातील उत्पादकांचेही नुकसान होत होते. त्यावर कायदेशीर कारवाई करणेही शक्य होत नव्हते. आता तशी कारवाई करणे शक्य होणार आहे.

निर्यात हापूस नावाने

हापूसला भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे तो त्याची निर्यात ‘हापूस’ या नावाने केली जाईल. यापूर्वी भारतीय आंबा या नावाखाली त्याची निर्यात होत होती. मानांकनामुळे जागतिक बाजारपेठेत हापूसची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.