चारशे ते बाराशे रुपये डझन

कोकणात होळीनंतर काही भागांत पडलेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे यंदा हापूस आंब्याची आवक गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी घटली आहे. रोगांमुळे हापूस आंबा काळवंडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हापूस आंब्याचे दर एप्रिल महिन्यातही कमी झालेले नाहीत. घाऊक बाजारात हापूस २०० ते ८०० रुपये प्रति डझनने विकला जात आहे. किरकोळ बाजारात हेच दर चारशे ते बाराशे रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे यंदा हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहण्याची चिन्हे आहेत.

साधारणपणे गुढीपाडव्यानंतर कोकणातून हापूस आंब्याची आवक वाढते. मात्र यंदा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात ४०-४५ हजार पेटय़ा हापूस दाखल झाला आहे. आवक ४० टक्क्यांनी घटली आहे. यंदा हापूस आंबे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होतील, असे आडाखे व्यापाऱ्यांनी बांधले होते. नोव्हेंबरनंतर कोकणातील हापूसला मोठय़ा प्रमाणात मोहर आला होता. हाच मोहर पाहून अनेक व्यापारी बागा विकत घेतात, मात्र जानेवारीनंतर पडलेली कडाक्याची थंडी, फेब्रुवारीमध्ये लांजा, रत्नागिरी भागात पडलेला अवकाळी पाऊस, त्यानंतरचे ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे हापूसचा मोहर गळून पडला.

सध्या झाडावरून काढण्यात आलेले हापूस आंबे घाऊक बाजारात येईपर्यंत काळवंडून जात आहेत. आंबे देठाजवळ काळे पडत आहेत. पाच डझनाच्या पेटीत दीड डझन आंबे सडके निघत आहेत. त्यामुळे हापूस आंबा विकणे जोखमीचे ठरत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पुढील आठवडय़ापासून ही आवक वाढण्याची शक्यता आहे, पण ती गेल्या वर्षीपेक्षा कमीच असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लागलेली कीड आणि घटलेली आवक यामुळे हापूस आंबा या महिन्यात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहण्याची चिन्हे आहेत.

१० मार्चपासून आलेले आंबे काळवंडल्याचे निदर्शनास आले आहे. हवामानातील बदलांचा मोठा परिणाम यंदा आंब्यावर झाला. एवढा गंभीर दुष्परिणाम यापूर्वी कधीही झाला नव्हता. त्यामुळे बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. आवक कमी आणि त्यात सडके आंबे यामुळे यंदा किमान एप्रिलमध्ये तरी हापूस सर्वसामान्यांना आवाक्याबाहेरच राहणार आहे. – संजय पानसरे, माजी संचालक, एपीएमसी, फळ बाजार, तुर्भे