News Flash

‘रेमडेसिविर’ वापराला सेवाग्राम रुग्णालयाकडून पर्याय

हृदयासाठी हानीकारक असल्याची भूमिका

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत देशमुख

तुटवडा आणि काळ्याबाजारामुळे सर्वाधिक चर्चेत असलेले ‘रेमडेसिविर’ औषध देणे बंद करण्याचा निर्णय सेवाग्रामच्या रुग्णालयाने घेतला असून अन्य औषधांमार्फत करोना रुग्णांवर उपचार करणारे हे एकमेव रुग्णालय ठरले आहे.

करोनावर रेमडेसिविर हे इंजेक्शन रामबाण असल्याचे गृहीत धरून उपचार होत आहेत. मात्र तसे नसल्याचे राज्याच्या करोना कृतिदलाने पूर्वीच स्पष्ट केले आहे. तरीही रेमडेसिविरच्या मागणीत काहीच फरक पडला नाही. या पार्श्वभूमीवर सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या समर्पित कोविड रुग्णालय म्हणून दर्जा मिळालेल्या कस्तुरबा रुग्णालयात गेल्या १५ दिवसांपासून रेमडेसिविर देणे बंद करण्यात आले आहे. या औषधाची शासनाकडे मागणी करावी लागते. तशा मागणीपत्रावर स्वाक्षरी करण्यास वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री यांनी स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. हृदयासाठी ते मारक असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अनुदानप्राप्त या रुग्णालयास अत्यंत माफक दरात औषधे उपलब्ध होतात. पण तरीही औषधाचा मारा न करण्याचे तत्त्व पाळणाऱ्या या रुग्णालयाने आता रेमडेसिविरबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे.

या औषधाचे नियोजन करणारे उपजिल्हाधिकारी नितीन पाटील म्हणाले की, सेवाग्रामच्या रुग्णालयाने गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरची मागणी नोंदवलेली नाही. ही चांगली बाब आहे. याबाबत रुग्णालयाची भूमिका स्पष्ट असल्याचे पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. वारंवार संपर्क साधूनही डॉ. कलंत्री यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी डॉ. कलंत्री यांनी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात रेमडेसिविरचा आग्रह धरू नये असे म्हटले होते.

भूमिका काय?

रेमडेसिविर कुप्यांमुळे रुग्ण बरा होतो किंवा गंभीर रुग्णाचा मृत्यू होत नाही किंवा फुप्फुसातील संसर्ग कमी करतो, हा जनतेतील समज चुकीचा आहे. या औषधाचा हट्ट धरू नये. वैद्यकीय क्षेत्रात यापेक्षा उपयुक्त इतरही औषधे आहेत. असे नमूद करीत या औषधाखेरीज अन्य उपायांनी रुग्ण पूर्णपणे बरे केल्याचा दावा येथील वैद्यकीय अधीक्षकांनी केला आहे.

पर्याय काय?

डेक्सा, इनोक्सा किंवा तत्सम औषधे तसेच प्रतिजैवके देऊन उपचार केले जात असल्याचे सेवाग्राम रुग्णालयातील एका डॉक्टरने नमूद केले. या रुग्णालयाने सुरुवातीपासूनच रेमडेसिविरचा अत्यंत अपवादात्मक स्थितीत वापर करण्याची भूमिका घेतली होती. या औषधाखेरीज उपाय करून करोना रुग्ण बरे केले जाऊ शकतात, यावरच त्यांनी भर दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:38 am

Web Title: alternatives to sevagram hospital for use of remedesivir abn 97
Next Stories
1 आपत्काळातही ‘दांडय़ा’ सुरुच
2 करोना मृतांचे वैद्यकीय परीक्षण
3 सांगली जिल्ह्य़ात वादळासह गारांचा पाऊस
Just Now!
X