05 December 2020

News Flash

विद्या बाळ यांचा संघर्षमय प्रवास त्यांच्याच शब्दात

त्यांच्या आजवरच्या आयुष्याच्या वाटचालीत अनेक चढ-उतार आले.

– विद्या बाळ

लग्नानंतर एक जबाबदार गृहिणी (वय वर्षे १८!) म्हणून मी घरखर्चाचा हिशेब लिहीत असे. लवकरच माझ्या लक्षात आलं की ‘पै न् पै चा हिशेब’ म्हणतात तसा आपला हिशेब लागतच नाही! अखेर मी स्वत:लाच समजावलं की आपला खर्च चोखच असतो. मग कशासाठी हिशेब ठेवायचा! १९५४/५५ मध्ये, दर दिवसाचा पाच-दहा रुपयांचा हिशेब तो काय, पण तोही ठेवणं मला जमलं नाही. तर मग आज वयाची ८० वर्षे पार केल्यावर इतक्या वर्षांचा श्रेयस प्रेयसाचा हिशेब नव्हे तरी मागोवा घेणं किती अवघड आहे, माझ्यासाठी! त्यातून स्मरणशक्ती म्हणाल तर चाळणीत ओतलेलं पाणी! बहुतेक साऱ्या घटनाप्रसंगांचे तपशील गायब. मनात नुसती ‘इंप्रेशन्स’बाकी. आधारकार्डासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या अंगठय़ाच्या ठशांसारखं आहे माझं. अंगठय़ावरच्या रेषा पुसून गेलेल्या आणि अंगठा ताठ!

आजघडीची अवस्था सांगायची तर मी अगदी समाधानी आहे. व्यक्तिगत जीवनात अस्वस्थता नाही. पण भवतालाबाबतची अस्वस्थता मात्र मनात शिगोशिग भरून आहे. ही अस्वस्थता मला जीवनावश्यक वाटते. कारण ती मला समजावते की मी जिवंत आहे. आजवरच्या आयुष्याच्या वाटचालीत अनेक चढ-उतार आले. ते जिंकता आले म्हणता येणार नाही. पण मी ते ओलांडून आले. एक विषय मात्र गेल्या २५-३० वर्षांपासून अधूनमधून आणि अलीकडे तर रोजच सतत सोबत करतो. प्रश्नचिन्ह होऊन उभा राहतो. इच्छामरण- त्यातलं स्वेच्छामरण. माझ्या आयुष्याचा मला योग्य वाटेलशा वेळी सन्मानाने निरोप घेता येईल का? हा तो प्रश्न, ज्यासाठी भारतात अनेक माणसं, अनेक पातळ्यांवर प्रयत्न करताहेत आणि मीही त्यात इवलासा वाटा उचलते आहे. याचा अर्थ आज मी उदास किंवा चिंताग्रस्त आहे असा मुळीच नाही. उलट या वयात मी जितपत प्रवास करते, काम करते, हिंडते फिरते त्याबद्दल माझ्या देहाप्रति अत्यंत कृतज्ञ आहे. फक्त ही अवस्था, आता दिवसेंदिवस कमजोर होत जाताना, मनात येतं- ज्यावेळी मला असं जगता येणार नाही. स्वावलंबन आणि आत्मसन्मान सांभाळणं अवघड होईल त्यावेळी मला माझ्या ‘सुखान्ता’ची वाट कुठे, कशी सापडेल? हा विचार मनाच्या तळाशी सतत तेवत असतो!

आजवर माझ्या आयुष्यानं मला खूप काही दिलं आहे. खरं तर माझ्या योग्यतेपेक्षा अधिकच दिलं आहे. मनात एकच भान जागं असतं. कालच्या ‘मी’पेक्षा आजची ‘मी’ काही थोडी वाढते, विकसित होते आहे की नाही? का नुसतं वयच वाढतंय? शाळा-कॉलेजच्या दिवसात अभ्यास, अभ्यासेतर स्पर्धा, उपक्रम यातही मी खूप काही मिळवू शकले. पण खरी मिळण्याची आणि मिळवण्याची सुरुवात, आकाशवाणी पुणे इथे ‘गृहिणी’ या विभागाची सूत्रसंचालक म्हणून काम करताना (१९५८) आणि त्याहीपेक्षा त्यानंतर ‘स्त्री’ मासिकात काम करण्यासाठी प्रवेश केला (१९६४) तेव्हा झाली. ‘स्त्री’ मासिकात मी कामाला लागले ती केवळ आर्थिक गरजेतून- पोटा-पाण्यासाठी. पण मग हळूहळू मी तिथेच रुजत गेले आणि शांताबाई/ मुकुंदराव किलरेस्कर या संपादक दाम्पत्याच्या मदतीने वाढत गेले. पोटार्थी म्हणून या परिवारात शिरलेली मी अर्थपूर्ण जाणिवा घेऊन २२ वर्षांनंतर बाहेर पडले. ‘स्त्री’च्या संपादकपदाचा राजीनामा देऊन मी १९८६ मध्ये एका नव्या वाटेचा शोध सुरू केला.

१९६४ पासून सुरू झालेला पत्रकारितेबरोबरचा माझा प्रवास गेली ५० वर्षे चालूच आहे. हे माझं सगळ्यात मोठं प्रेयसही आहे आणि श्रेयसही. शाळकरी अभ्यासात मराठी भाषा आवडायची. निबंधलेखनात मन रमायचं. या आवडीच्या बीजांना अंकुरण्याची आणि मोहोरण्याची मिळालेली संधी मी इतकी वर्षे उपभोगते आहे. पत्रकारितेनं मला गरज असूनही फारसा पैसा दिला नाही. पण त्यापलीकडचं एवढं अमोल असं काही दिलं आहे की, पैसा नाही म्हणून त्यापासून दूर जाण्याचा विचार माझ्या स्वप्नातही आला नाही. म्हणूनच ‘स्त्री’ मधल्या स्थिर नोकरीतून बाहेर पडल्यावर एका परीनं बिनआधाराचा ‘मिळून साऱ्याजणी’चा वेडा वाटणारा घाट मी घातला. मला लख्ख उमगलं होतं की, ‘स्त्री’ची नोकरी सोडली तरी तिनं जागवलेली स्त्री प्रश्नांची जाण आणि पत्रकारिता मी विसरू शकत नाही. स्वत:मधल्या आणि परिवर्तनाच्या दिशेनं नेणारी हीच वाट आहे, हे मी समजून चुकले होते.

जन्मानं, मध्यमवर्गीय ब्राह्मणी, पुणेकर कुटुंबातली मी आज आहे तशी ‘तेव्हा’ नव्हते. जन्मल्यापासून पस्तिशीपर्यंतच्या आयुष्यात अल्पसंतुष्ट, पारंपरिक वृत्तीच्या माणसाला हवं असतं, तितपत सारं काही मला मिळालं होतं. तरीही ‘स्त्री’ मधल्या कामामुळे हळूहळू एकेक प्रकाशकिरण माझं डोकं नांगरायला लागला होता. आज्ञाधारकता, पारंपरिकता यांनी बनलेली मनाची टणक भूमी भेदून प्रश्नांचे कोंब वर यायला लागले होते. तिथपासून जन्माला आलेली जीवनावश्यक अस्वस्थता आजही माझ्यासोबत आहे. ‘स्त्री’मधल्या कामातून अनेक लेखक-लेखिकांचा सहवास मिळाला. नव्या पुस्तकांची आणि विचारांची ओळख व्हायला लागली. नवीन मित्र-मैत्रिणी भेटल्या. या सगळ्यांमुळे मला चाकोरीबद्ध जगाच्या पल्याड बघण्याची ‘दृष्टी’ मिळाली. यातलाच पण ‘स्त्री’ मासिकाच्या बाहेरचाही एक अतिशय महत्त्वाचा स्रोत म्हणजे

श्री. पु. भागवतांचा स्नेह. खरं तर त्यांच्यातला माणूस आणि संवेदनशील संपादक यावर मला खूप काही म्हणायचं आहे. शब्दांच्या मर्यादेत ते मावणारं नाही. त्यांचा स्नेह ही माझ्या आयुष्यातली मौल्यवान ठेव आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मी दुसऱ्यांदा वयात आले. एकदा शारीर पातळीवर आणि नंतर पुन्हा एकदा वैचारिक पातळीवर!

माझं पस्तिशीपर्यंतचं ‘मध्यमवर्गीयपण’ याचं एक महत्त्व आहे. ते वाया नाही गेलं. पुढच्या बदललेल्या आयुष्यात मला त्याचा खूपच हातभार लागला. तात्यासाहेब केळकर माझे आजोबा. लोकमान्य टिळकांचे सहकारी, नंतर ‘केसरी’चे संपादक, टिळकांसोबत जहालपंथीय, हिंदुमहासभावादी- घरातला हा वारसा. शिवाय मोठा भाऊ आणि नंतर नवरा दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिलेदार. त्यापायी कारावास भोगलेले. महाराष्ट्रात बहुसंख्य मध्यमवर्गीयांना तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस किंवा अन्य डाव्या पक्षांपेक्षा संघ, जनसंघ आणि आता भाजप. यांना जवळचं मानणारे. याच पाश्र्वभूमीवर मी १९७४ मध्ये पुणे मनपाची निवडणूक लढवली. जनसंघ पुरस्कृत उमेदवार म्हणून! निर्णय फार विचारपूर्वक घेतला असं नाही. पण जेव्हा रामभाऊ म्हाळगींनी शब्द टाकला तेव्हा माझा इवलासा अहंकार सुखावला असावा. जीव खुशालला आणि मी प्रवाहात वाहून गेले! मी निवडणूक अर्थातच हरले. याच्याच आसपासच्या काळात मेंदूत प्रश्नांचं भरघोस पीक यायला लागलं होतं. धर्म, परंपरा, संस्कृती यांच्यासमोर स्वत:ला नव्यानं उभं करायला सुरुवात झाली होती. त्यातच १९७५ हे आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष जाहीर झालं. सारं काही एकेक करत जमून येत होतं. ती शिदोरी सांभाळत, जपत, माझा प्रवास सुरू झाला. उजवीकडून डावीकडे. आज मी १८० अंशामध्ये फिरून ठामपणे डावीकडे उभी आहे.

आज मध्यमवर्गीय, शिकलेल्या, मिळवत्या स्त्रियांची परिवर्तनाबाबत बरीच उदासीनता आहे असं मला दिसतं. त्या बाह्य़ स्वरूपात बऱ्याच आधुनिक दिसतात, पण विचारानं, आतून त्या बहुधा परंपरावादी किंवा थबकलेल्या दिसतात. त्यांच्याभोवतीची संस्कार, संस्कृती, परंपरा यांची अदृश्य चौकट त्यांचीही वाट अडवत असावी तर काहींना ही बंदिस्त चौकट जाणवतही नसावी. काहींना ती जाणवली तरी ती ओलांडण्याची निकड वाटत नसावी. त्यामुळेच त्यासाठीच्या कप्प्यांपेक्षा आहे त्यातला सुरक्षितपणा त्यांना बरा वाटत असावा. हे बघताना मला या वातावरणातलं माझं रमणं आणि डुंबणं, आठवतं. तो अनुभव मला परिवर्तनाच्या कामात, जागरणात उपयोगी पडतो. माझा दम लवकर आटत नाही, धीर सुटत नाही. लिहिण्यातून, बोलण्यातून, कृतीतून मी प्रयत्नशील राहते. कारण माझा विश्वास आहे की सर्वहारा स्त्रियांपेक्षा यांच्याजवळ, शिक्षण, पैसा, सुविधा यांचा केवढा संचय आहे ते सारं कामी लावण्याची आपली जबाबदारी आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक आणि ‘नारी समता मंच’ ही संघटना या माझ्या माध्यमांचा मला यासाठी केवढा तरी आधार घेता येतो. हे दोन्ही घटक असंख्य वाटांनी मला जीवनरस पुरवत असतात. स्वत:चे एक आयुष्य जगता जगता मला या दोन्ही माध्यमातून, वेगवेगळ्या माणसांच्या जगण्याचा एक तुकडा बनण्याची संधी दिली आहे. आजच्या जमान्यात, सगळीकडे पैसा हेच जवळपास एकमेव चलनी नाणं बनलं आहे, आमच्याकडे पैसा खूपच मर्यादित आहे. पण इतर पैसेवाल्या अनेक माध्यमांपेक्षा आमच्या आर्थिक कोंडीतही आम्ही बरंच स्वातंत्र्य उपभोगू शकतो, याचं मला समाधान आहे. कारण यातच आयुष्यातलं प्रेयस आणि श्रेयस जोडीनं सोबतीला आहे.

मी नेहमीच म्हणत आले आहे की मी एक कार्यकर्ता आणि संपादक आहे. कुणी मला लेखक आणि विशेषत: विचारवंत म्हटलं तरी मी ते स्वीकारू शकत नाही. कारण मी मोठी तर नाहीच, पण छोटीही अभ्यासक नाही. मला पटलेले थोरामोठय़ांचे विचार मी लोकांपर्यंत पोचवते. भारवाहकासारखी. मी वाचते, पण त्याहून अधिक काम अनुभवते. या अनुभवाच्या आधाराने मी लिहिते. यामध्ये माझ्या एकेकाळच्या मध्यमवर्गीय म्हणून जगण्याच्या अनुभवाचा उपयोग झाला. तसाच या चाकोरीतून बाहेर पडतानाचे ‘पेअर्स ऑफ ग्रोथ’ही माझ्या मदतीला आले. जमिनीत पेरणी करण्यापूर्वी नांगरट केली जाते. त्या नांगराच्या फाळाच्या वेदनांनंतरच जमिनीत पीक उभं राहातं. पीक घेण्यासाठीची ती किंमत आहे. माझ्या मूळच्या भावनाशील स्वभावाला आवर घालून मी विचाराचा काठ पकडला. हा बदल मला जाणीवपूर्वक स्वत:मध्ये घडवावा लागला. तेव्हा हे लक्षात आलं की हा मार्गच योग्य असला तरी खडतर आहे. त्यावर चालताना, प्रश्न विचारणाऱ्या ‘मी’ला उत्तर शोधताना त्या ‘मी’शी होणाऱ्या भांडणाला सामोरं जावं लागतं! मात्र उत्तर सापडलं, पटलं तर भांडण तर संपतंच, वर त्या वाटेवर ताठपणे चालण्याचं बळ येतं. या वाटेवर चालताना माझ्या वाटय़ाला काही नकार आले. त्यातले काही मीच निवडलेले होते. हे सगळेच्या सगळे नकार अखेर माझ्यासाठी कमालीचे सकारात्मक ठरले!

पहिला नकार होता, आकाशवाणी पुणे केंद्रावरच्या ‘गृहिणी’ या विभागाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालकपद सोडतानाचा. ‘निर्माता’ या पदासाठी माझी निवड झाली नाही. ज्योत्स्ना देवधरांची निवड करण्यात आली. खरं तर ती निवड योग्यच होती. वयाच्या तेविसाव्या वर्षी, एवढं महत्त्वाचं पद मला न देण्यात नक्कीच काही व्यावहारिक विचार असणार! तरीही त्यावेळी वाटलं आपल्यावर खूप अन्याय झाला आहे. मिळाली असती तर ती संधी चांगलीच होती. पण आता वाटतं, त्या सरकारी नोकरीत न अडकता मी बाहेर पडले म्हणूनच मी लवकरच ‘स्त्री’ मासिकाचं दार ठोठावलं. ते दार उघडलं आणि तिथूनच तर माझ्या अर्थपूर्ण जीवनाचा पाया घातला गेला. ही गोष्ट १९६० ची. त्यानंतर १९७४ मध्ये मनपाच्या निवडणुकीतला पराभव हा दुसरा नकार. तिथे मी जिंकले असते तर आज नक्कीच भाजप या पक्षात मोठं काही कमावून बसले असते. पण ती वाट खरंच माझ्यासाठी नव्हती. भलत्याच जंगलात हरवले असते मी. तेव्हाही मला निवडणुकीच्या पराभवाचं दु:ख झालंच. पण आज मात्र मनापासून वाटतं की मी मरता मरता वाचले आहे! त्यानंतरचा तिसरा नकार आहे ‘स्त्री’ मासिकाची संपादक असताना १९८६ मध्ये दिलेल्या राजीनाम्याचा. आधीचे नकार हे माझ्या वाटय़ाला ‘आलेले’ अनाहूत नकार होते. ‘स्त्री’मधल्या कामाला दिलेला नकार हा मी स्वत: ‘दिलेला’ नकार होता. किलरेस्कर ब्रदर्स हे किलरेस्कर प्रकाशनचे प्रोप्रायटर होते. त्यांनी ही प्रकाशनं गुडविलसकट विकण्याचा निर्णय घेतला. त्या नव्या मालकांबरोबर कामाचं निमंत्रण असताना मी ते नाकारून बाहेर पडले. आता पुढे काय करायचं याचा मी विचार करत होते. माझ्या लक्षात आलं. पत्रकारितेचा हा अनुभव आणि स्त्रीप्रश्नाची जाण हे ‘स्त्री’मधल्या संपादनाच्या कामाचं फलित माझ्या हातात होतं. त्याला मला अंतर द्यायचं नव्हतं. त्यातूनच ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’चा जन्म झाला. किलरेस्कर उद्योगाच्या पाठबळावर चालणारं ‘स्त्री’ मासिक कुठे आणि मी एकटीनं लोकपाठबळाच्या मोठय़ा अपेक्षा मनात ठेवून सुरू केलेले ‘मिळून साऱ्याजणी’ कुठे! खरं तर तो एक वेडेपणाचा ठरेलसा निर्णय होता. ‘स्त्री’ मासिकाने केलेले काम आणि नव्यानं सुरू झालेलं नारी समता मंचाचं काम, यामुळे अनेकांच्या मनात असलेले माझ्याबाबतचं प्रेम आणि विश्वास याच्या बळावर सुरू झालेल्या या मासिकानं आज २८ वर्षांची वाटचाल पुरी केली आहे. अनेक पुरस्कारांसह! हेही एक श्रेयसच.

आणखी एक महत्त्वाचा नकार म्हणजे वयाच्या पन्नाशीत, घरसंसाराला नकार देऊन घेतलेला संन्यास. रूढ अर्थानं संन्यास सामान्यत: पुरुष घेतात आणि हिमालयात जाऊन ज्ञानसाधना करतात. मी माणसांमध्ये राहून माणसांसाठीच काम करण्यासाठी संन्यास घेतला. कामासाठीच्या धडपडीला पूर्ण अवकाश मोकळं झालं. ‘नारी समता मंच’च्या माध्यमातून अन्यायग्रस्त स्त्रियांना आत्मभान आणि आत्मसन्मान जपण्या-जोपासण्याबाबत आम्ही पोटतिडकीने सांगत मदत करत आलो आहोत. मग आपल्या व्यक्तिगत जीवनात त्याच्या आचरण्याचं काय? हा प्रश्न मी स्वत:लाच कठोरपणे विचारला. मी घर सोडलं. ‘स्त्री’ची नोकरी सोडलेली घरही सोडलेलं. असा तो काळ होता! लवकरच ‘मिळून साऱ्याजणी’ची सुरुवात झाली. त्यानंतर लोक जेव्हा विचारत ‘तू एकटी राहातेस?’ तेव्हापासून आजतागायत माझं उत्तर आहे, ‘नाही. मी मिळून साऱ्याजणीसोबत राहते.’ पहिली दहा वर्षे ‘साऱ्याजणी’चं कार्यालय माझ्या छोटय़ा फ्लॅटमध्ये होतं.

गेली ३० वर्षे एकटीने राहण्याच्या, जगण्याच्या प्रवासात एकटेपण आणि एकाकीपणाविषयीची किती तरी खुळं गळून पडली. एकटं राहणं महाभयानक आणि कठीण या संस्काराचं मिथक खोटं ठरलं! माझा आत्मविश्वास वाढला. हिंमत वाढली. स्वतंत्रता आणि शांतता माझ्यासोबत वस्तीला आली. आता वार्धक्यातलं एकटेपण अजून तरी त्रासदायक वाटत नाही. कारण स्वावलंबन शाबूत आहे. पण उद्या निर्थक जगवणारं परावलंबन वाटय़ाला आलं तर? सन्मानानं मरण्याच्या हक्कासाठी म्हणूनच आमचा प्रयत्न चालू आहे. माझ्या हयातीत ते काही घडेलसं वाटत नाही. तरी पण केव्हा तरी उजाडेलच!

स्त्री-पुरुष समतेच्या चळवळीचं काम हे माझं प्राधान्याचं काम आहे. या कामानं मला खूप शिकवलं, समजावलं आणि वाढवलंही. लौकिक अर्थानं किती अन्यायग्रस्त स्त्रियांना आम्हाला न्याय मिळवून देता आला हे सांगणं कठीण आहे. पण अनेकींच्या मनात माणूस म्हणून जगण्याची जाणीव जागी करणं, बाईचा जन्म म्हणुनी ‘न व्हावे उदास’ हे लक्षात ठेवत जगणं या दृष्टीनं मानसिकतेत थोडासा बदल नक्की घडून आला. विशेषत: हे त्यांच्याच तोंडून किंवा लिहून, बोलून माझ्यापर्यंत पोचतं झालं. ही पहाटेच्या किरणाची चाहूल आहे.

याखेरीज आणखीही काय काय मिळालं! मलाच नव्हे तर माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना ‘घरं फोडणाऱ्या’, ‘संसार मोडणाऱ्या स्त्रिया’ अशी बिरुदं मिळाली. ‘या स्त्री मुक्तीवाल्या’ म्हणत प्लेगच्या उंदरासारखं संपर्क टाळण्यात आला आणि एका पत्रकारानं तर मला ‘स्त्री चळवळीतला हिजडा’ असा किताबही बहाल केला. ‘मी संत नाही, त्यामुळे त्या त्या वेळी वाईट वाटलंच. पण विवेकानं तारलं खरं! याची दुसरी बाजू म्हणजे याच कामामुळे मला नैरोबी, ब्रायटन, बोस्टन, श्रीलंका अशा परदेशातल्या स्त्रियांच्या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील ‘मदर ऑफ विमेन्स मूव्हमेंट’- बेटी फ्रीडनला, इजिप्तच्या डॉ. नवाब अल सादवीला भेटण्याची संधी मिळाली. ससेक्स विद्यापीठात त्यांनी दिलेल्या स्कॉलरशिपमुळे ‘विमेन, मेन अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट’ हा अभ्यासक्रम करता आला. देश-विदेशातल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी, परिषदा यामुळे क्षितिज विस्तारलं. जगणं समृद्ध आणि श्रीमंत होत राहिलं. त्याबरोबरच आपण कुठे आहोत, आणखी केवढा पल्ला गाठायचा आहे, याचं भान आलं.

आधी सांगितल्याप्रमाणे वयाच्या तिशी-पस्तिशीपर्यंत टिळकांची विचारधारा, आजोबांचा हिंदुमहासभेसारख्या संस्थेतला सहभाग, पुढे भाऊ आणि नवरा यांच्या रा. स्व. संघाच्या जवळिकीचा प्रभाव- या सगळ्याच्या छायेत कुटुंबजीवन चालू होतं. त्यामुळेच गोपाळराव आगरकर, सावित्रीबाई, जोतिबा फुले यांची ओळख खूपच उशिरानं चळवळीतली कार्यकर्ता झाल्यावर घडून आली! पण एकदा ओळख झाल्यानंतरचा प्रवास झपाटय़ाने झाला आणि चालूच राहिला. आगरकरांचा विवेकवाद जगण्याचा अविभाज्य भागच बनून गेला आणि सावित्री, जोतिबाच्या रूपात, चळवळीतले माय-बापच भेटले. त्यामुळे आजवर मिळालेल्या पुरस्कारांपैकी या तिघांच्या नावानं मिळालेल्या पुरस्कारांनी खरं धन्य वाटलं! पाठीवर हात फिरल्यासारखं वाटलं!

आजवरच्या आयुष्यातलं, बरं/वाईट प्रामाणिकपणे पुढय़ात घ्यायचं ठरवलं तेव्हा तुटकंफुटकं आणि काही लख्खही अचानक खुणावायला लागलं. पण शब्दमर्यादा सांभाळण्यासाठी खूप काही बाजूला ठेवते आहे. तरीसुद्धा आज मी जी काही आहे, जे काही छोटंसं काम करते आहे, त्याची मुळं केव्हा, कशी रुजली याबाबतची कृतज्ञतेची भावना नोंदवणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. एक मैत्रीण, शैला बापट वयानं माझ्याहून लहान. अतिशय बुद्धिमान. मला पेलवणार नाही एवढं प्रेम आणि मैत्री देणारी. माझ्यामध्ये सुप्त असलेल्या किती तरी श्रेयसांना तिनं जागं केलं. विचारांची मदत घेत स्वत:शी भांडायला शिकवलं. प्रश्न विचारण्याचं धाडस दिलं, सवय लावली! दुसरा, एक मित्र अरुण लिमये. त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या चार वर्षांत तो भेटला. त्याच्यामुळे त्याच्या भोवतीच्या अनेक ग्रामीण कार्यकर्त्यांची ओळख झाली. पोटापाण्यासाठी तमा न बाळगता खेडोपाडी संघर्षशील काम करणारे कार्यकर्ते. अरुणमुळेच मी ‘भीमपुरा’ या वस्तीत आणि तिथल्या वास्तवापर्यंत पोचले! विचार करायला आणि त्याला कृतीची जोड द्यायला या माझ्या दोन मित्रांनी शिकवलं. दोघेही अल्पायुषी. १९८२ च्या एप्रिल आणि मे महिन्यात, एकापाठोपाठ एक दोघांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या प्रेमाचे आणि मैत्रीचे धागे घट्ट धरून ठेवत मी चालत राहिले आहे!

माझं ‘विस्तारित कुटुंब’ खूप मोठं आहे. त्यामुळेच आजाराच्या, आनंदाच्या, कौतुकाच्या किंवा कठोर निंदेच्या अशा प्रकारच्या असंख्य प्रसंगात मी कधीच एकटी पडले नाही. या साऱ्या प्रेमाच्या माणसांमुळेच मी अजून उभी आहे, चालते आहे. पळणं अर्थातच थांबलं आहे! माणूसपण म्हणजेच विचारी मेंदू आणि संवेदनशीलता म्हणजेच माणुसकी यांच्याशी इमान राखत मी जगते आहे. माणूस म्हणून जगताना आणि मरतानाही आणखी काय हवं असतं माणसाला?

(टीप : ३ फेब्रुवारी २०१८ रोजी चतुरंगमध्ये विद्या बाळ यांचा हा लेख ‘अजून चालतेचि वाट’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाला होता.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 10:48 am

Web Title: amazing success story of social worker vidya bal jud 87
Next Stories
1 … तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल; अशोक चव्हाणांचा इशारा
2 मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे सांगायला लाज वाटत नाही – जितेंद्र आव्हाड
3 “शिवसेनेनं प्रस्ताव दिला, तर भाजपा सत्ता स्थापनेसाठी तयार”
Just Now!
X