विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे विजयी झाले. दानवे यांनी काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव केला.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीसाठी युतीकडून शिवसेनेचे अंबादास दानवे, तर आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान पार पडले होत. ६५७ मतदारांपैकी ५४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. होता. १० मतदार गैरहजर राहिले होते. मतदारसंघात नगरसेवक आणि जि. प. सदस्य मतदान करतात. या दोन्ही जिल्ह्यात ६५७ पात्र मतदार असल्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाशित करण्यात आली होती. एका नगरसेवकास मतदार यादीत ठेवायचे की नाही यावरून संभ्रम होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जि. प. सदस्य भागवत उफाड यांचाही मतदार यादीत समावेश करण्यात आला होता. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे ३३० आणि महाआघाडीकडे २५०, तर एमआयएम आणि अपक्ष यांची ७७ मते होती. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या अब्दुल सत्तार यांनीही दानवे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे युतीच्या विजयाची घोषणाच शिल्लक राहिली होती.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. त्यात युतीचे उमेदवार अंबादास यांना ५२४ मते मिळाली. तर आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांना १०६ मते मिळाली. दानवे यांनी तब्बल ४१८ मतांनी कुलकर्णी यांचा पराभव केला. दानवे यांच्या विजयाला एमआयएमनेही हातभार लावला असल्याच्या चर्चा निवडणूक निकालानंतर सुरू झाली आहे.