आरती वानखेडे मारहाणप्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा वाद आता रस्त्यावर आला आहे. महाविद्यालयाच्या दलित महिला प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी या पदाचे दावेदार धनाजी गुरव यांच्यावर कारवाई करावी यासाठी सोमवारी महाड येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर कॉलेज बचाव समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मागील आठवडय़ात या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आरती वानखेडे यांना गुंडांकरवी मारहाण करीत प्राचार्य धनाजी गुरव यांनी महाविद्यालयाच्या आवारात तोडफोड केली व प्राचार्यपदाच्या खुर्चीचा जबरदस्तीने ताबा घेतला. त्यावरून रणकंदन माजले होते. यासंदर्भात तक्रार करून देखील धनाजी गुरव यांच्यावर पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
यामुळे सामान्य नागरिक आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी वर्गात कमालीचा संताप होता. धनाजी गुरव यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी महाड प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेकडो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकत्रे मधुकर गायकवाड, बशीर चिचकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बिपीन महामुणकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळ राऊळ यांनी केले. दलित उच्चशिक्षित प्राचार्य महिलेवर जीवघेणा हल्ला झाला असताना पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
आंदोलकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांची भेट घेऊन निवेदन दिले व धनाजी गुरव यांच्यावर कारवाईची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आठवडाभरात ती पूर्ण होईल. त्यानंतर यात कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सुषमा सातपुते यांनी दिले.