04 July 2020

News Flash

अमित देशमुख यांचा भाजपविरोधात ‘लातूर पॅटर्न’

रेल्वेने पाणीपुरवठा सर्वाधिक काळ करावा लागलेले शहर म्हणून लातूर ओळखले जाऊ लागले.

साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोग यशस्वी

प्रदीप नणंदकर, लातूर

लातूर जिल्हय़ावर दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत असताना बंद पडलेल्या श्रीसंत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापले आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेऊन या निवडणुकीत महाआघाडी स्थापन केली व भाजपला एकाकी पाडले. सर्व १६ जागांवर एकहाती विजय मिळवण्यात त्यांना यश आले. मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पॅनलने एकाकी झुंज दिली. मात्र ‘हात दाखवून अवलक्षण’ करण्याची पाळी अभिमन्यू यांच्यावर आली व त्यांची ‘झाकलेली मूठ’ या निवडणुकीच्या निमित्ताने उघड झाल्यामुळे त्यांची कोंडी झाली.

२०१५ साली लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला. रेल्वेने पाणीपुरवठा सर्वाधिक काळ करावा लागलेले शहर म्हणून लातूर ओळखले जाऊ लागले. एकेकाळी ५० हजार हेक्टरवरील उसाचे क्षेत्र २०१५ मध्ये पाच हजार हेक्टर इतके खाली आले. राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना राबवली. २०१६-१७ व २०१७-१८ अशी दोन वर्षे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पुन्हा उसाचे क्षेत्र ५० हजार हेक्टरच्या आसपास पोहोचले. त्यामुळे सर्वच कारखान्यांना चांगले दिवस येतील, अशी आशा निर्माण झाली.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पाण्याची पातळी घटली. त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढलेले असतानाही ऊस पीक चांगले झाले नाही. तो मोडण्याची पाळी अनेक शेतकऱ्यांवर येते आहे. जेथे प्यायला पाणी नाही तेथे ऊस पोसायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वातावरणात मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली. विलासराव देशमुखांनी जिल्हय़ात शेतकऱ्यांच्या घरात चार पैसे यावेत यासाठी साखर कारखाने उभे केले व ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. त्याचाच भाग म्हणून औसा तालुक्यात मारुती महाराज साखर कारखाना सुरू केला. पहिल्या वर्षी तो मांजरा परिवारात होता. मात्र, दुसऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आ. दिनकर माने यांनी सवतासुभा मांडला व देशमुखांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक जिंकली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही पुन्हा मानेंचेच पॅनल विजयी झाले. त्या दहा वर्षांच्या काळात मानेंचे संचालक मंडळ निवडले गेले तरी त्यांना कारखाना चालवता आला नाही. दहापैकी आठ वर्षे कारखाना बंद होता.

देशमुखांनी जिल्हा बँकेतून आपली अडवणूक केली म्हणून कारखाना आपण चालवू शकलो नाही, असे माने सांगत होते. कारखान्याच्या डोक्यावर १४ कोटी रुपयांचे कर्ज झाल्यामुळे कारखाना पुन्हा चालवणे केवळ अशक्य झाले. जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतला.

निवडणुकीच्या निमित्ताने आ. अमित देशमुख यांनी सर्वाची मोट बांधत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र केले व सर्वाच्या सहमतीने १६ जणांचे पॅनल निवडणुकीच्या िरगणात उतरवले. त्यासाठी त्यांना काँग्रेसचे आ. बसवराज पाटील मुरूमकर यांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक अभिमन्यू पवार हे आगामी विधानसभा निवडणूक औसा विधानसभा मतदारसंघातून लढवू इच्छितात. साखर कारखान्याची निवडणूक ही चाचणी म्हणून त्यांनी लढवण्याचे ठरवले. त्यासाठी मुंबई जिल्हा बँकेचे आ. प्रवीण दरेकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हय़ातील आ. सुधाकर भालेराव, आ. विनायक पाटील, रमेश कराड असा मोठा ताफा गोळा केला. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मात्र या निवडणुकीतून अंग काढून घेतले. अभिमन्यू पवार विरुद्ध अमित देशमुख अशी सरळ लढत झाली. अपेक्षेप्रमाणे अमित देशमुख यांच्या महाआघाडीची सरशी झाली असली तरी अभिमन्यू पवार यांच्या पॅनललाही लक्षणीय मते मिळाली आहेत.

कारखान्याचे सभासद वाढवण्यात दिनकर माने यांचा मोठा हात होता. मात्र, अशी सभासद मंडळी भाजपाची कसलीही ताकद नसताना अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी उभी राहतात याचाही अर्थ लक्षात घ्यायला हवा.

या वर्षी मारुती महाराज कारखाना सुरू होऊ शकणार नाही. पुढील वर्षी ऊस नसल्यामुळे कारखाना सुरू करता येणार नाही. त्यामुळे ‘ओसाड गावची पाटीलकी’ अमित देशमुखांकडे आली आहे. गावचे चित्र मात्र लवकर बदलण्यात त्यांना यश येणार नाही हे स्पष्ट आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपण कोणती राजकीय खेळी करू शकतो याची चुणूक दाखवण्यात देशमुखांना यश आले आहे तर पवारांना ‘नमनालाच घडाभर तेल’ ओतावे लागल्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल असा संकेत मतदारांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 3:56 am

Web Title: amit deshmukh latur pattern against bjp
Next Stories
1 कापसाला जादा भाव मिळूनही शेतकरी लाभाविनाच!
2 जाहिरातबाजी करणाऱ्या भाजपला उघडे पाडा
3 लाचखोरीने सीबीआयची विश्वासार्हता धोक्यात
Just Now!
X