देशात राजकारणाचे व्यापारीकरण करण्याचा उद्योग शरद पवार यांनी केला आहे. राज्यातील भ्रष्ट आघाडी शासनाच्या कारभाराचा वस्तुनिष्ठ तपास झाला तर एकही मंत्री तुरूंगापासून वाचू शकणार नाही, अशा शब्दांत  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी विरोधकांवर हल्ला चढविला. तत्त्वाला तिलांजली देऊन राजकारण करणारी ही प्रवृत्ती उखडून टाकून सिध्दांतावर राजकारण करणाऱ्या भाजपाकडे राज्याची सत्ता सोपवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले शहा यांनी आज करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करीत असल्याचे येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. विमानतळाजवळ सकाळी ९ वाजता  झालेल्या कार्यक्रमात अवघ्या १२ मिनिटांच्या भाषणांत त्यांनी राज्यातील आघाडी शासनाच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काँग्रेसमुक्त भारताच्या स्वप्नाला साथ देण्यासाठी राज्यातील सत्ता उलथवून टाकण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
एकेकाळी देशाचे नेतृत्व महाराष्ट्राने केले होते, असा गौरवपूर्ण उल्लेख करून शहा यांनी औद्योगिक विकास, कृषिक्षेत्रातील प्रयोग, सिंचनाची अंमलबजावणी, भक्कम सहकार चळवळ याकरिता महाराष्ट्राचे उदाहरण दिले जात होते. पण या क्षेत्राला चूड लावण्याचे काम राज्यातील आघाडी शासनाने केले आहे. राज्याचे वर्षांचे अंदाजपत्रक २ लाख कोटीचे आहे हा हिशोब धरता पाच वर्षांत १० लाखांचे अंदाजपत्रक होते. पण या भ्रष्ट आघाडी शासनाने गेल्या पाच वर्षांत राज्यात ११ लाख २८ हजार रुपयांचा घोटाळा करून साधी ढेकरही दिलेली नाही. त्यामुळे पुरोगामी राज्याचे नेतृत्व कोणत्या पक्षाकडे सोपवायचे याचा निर्णय विधानसभा निवडणुकीत घ्यावयाचे असल्याने जनता भाजपाकडे निश्चितपणे सत्ता सोपवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपा-शिवसेना या पक्षातील जागा वाटप सन्मानाने व्हावे असे नमूद करतानाच शहा यांनी भाजपाने दोन पावले पुढे येण्याची तयारी दर्शवली असून शिवसेनेनेही अशीच कृती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
भाजपाचे प्रदेशअध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने परिवर्तनाचा मंत्र दिला आहे. त्या निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही येथील जनता आघाडी शासनाला धारातीर्थी केल्याशिवाय राहणार नाही, तसा शब्द अगदी सकाळी झालेल्या सभेला उपस्थित राहिलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शहा यांना द्यावा असे आवाहन त्यांनी केले.