गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांच्या भेटीवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी दुपारी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिलेले भेटीचे निमंत्रण ऐन वेळी धुडकावले. परंतु त्याऐवजी पत्रकारांना भेटून शहा नवी दिल्लीस रवाना झाले. परंतु दर्डा यांनी शहा यांना दिलेल्या निमंत्रणामुळे भाजपच्या आमदारांमध्ये मात्र चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु भेट ऐन वेळी टळल्याने या आमदारांचा जीवही अखेर भांडय़ात पडला.
दर्डा यांच्याकडून चहापानाच्या निमित्ताने शहा यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात दर्डा यांचा भाजपच्याच अतुल सावे यांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. मात्र, दर्डाची अनामत रक्कम जप्त झाली. निकालानंतर राजकीय पीछेहाट झालेल्या दर्डा यांच्या पुढील वाटचालीविषयी चर्चा होत होती. ते भाजपममध्ये प्रवेश करणार काय, याचीही चर्चा रंगली होती. या चर्चेची हवा कायम असतानाच शनिवारी दर्डा यांचे निमंत्रण स्वीकारून शहा हे दर्डा कुटुंबीयांच्या भेटीस जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. या भेटीच्या अनुषंगाने दर्डा यांच्या निवासस्थानापुढे पोलिसांनी बंदोबस्तही लावला होता. परंतु प्रत्यक्षात शहा यांनी ही भेट टाळली. पत्रकारांची भेट घेऊनच ते दिल्लीला परतले.
तत्पूर्वी, शहा यांनी दौलताबाद येथील हनुमान मंदिरात अभिषेक केला, तसेच भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. जैन मुनी विजयरत्नसुंदरसुरी महाराज यांचीही शहा यांनी भेट घेतली.
दरम्यान पक्ष बदलण्याबद्दलच्या वावडय़ा फेटाळत दर्डा म्हणाले, की मी पक्ष बदलणार नाही. पण यापुढे पक्षात किती सक्रिय असेन हे देखील अद्याप ठरवलेले नाही.
भोकदरन येथील मुक्कामी
अमित शहांच्या भेटीगाठी
वार्ताहर, जालना
रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी आलेल्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भोकरदन येथेच मुक्काम केला. या वेळी मराठवाडय़ातील भाजपचे काही आमदार, तसेच जालना शहरातील उद्योजकांनी त्यांची भेट घेतली. भेटीस आलेल्यांचे म्हणणे ऐकून घेताना शहा यांनी फारसे बोलणे टाळले.
पैठणचा कार्यक्रम आटोपून रामेश्वर कारखान्याजवळ शहा यांचे हेलिकॉप्टर उतरले, तेव्हा पाऊस सुरू झाला होता. भर पावसातच छोटेखानी भाषण करून शहा भोकरदनला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथेच मुक्काम केला. पक्षाच्या नव्या-जुन्या आमदारांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागावी, या साठी विनंती करणारी काही मंडळीही शहा यांना भेटली. जालना शहरातील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने औद्योगिक विकासाच्या संदर्भात शहा यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.
भाजप जिल्हाध्यक्ष बबन लोणीकर, संभाजी निलंगेकर, नारायण कुचे, अतुल सावे, प्रशांत बंब, सुधाकर भालेराव, संतोष दानवे हे मराठवाडय़ातील पक्षाचे आमदार उपस्थित होते. माजी आमदार अरविंद चव्हाण व विलास खरात यांनीही शहा यांची भेट घेऊन स्वागत केले.