गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांच्या भेटीवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी दुपारी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिलेले भेटीचे निमंत्रण ऐन वेळी धुडकावले. त्याऐवजी पत्रकारांना भेटून शहा नवी दिल्लीस रवाना झाले. परंतु दर्डा यांनी शहा यांना दिलेल्या निमंत्रणामुळे भाजपच्या आमदारांमध्ये मात्र चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली होती. ऐन वेळी ही भेट टळल्याने आमदारांचा जीव भांडय़ात पडला.
निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात दर्डा यांचा भाजपच्याच अतुल सावे यांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. मात्र, दर्डाची अनामत रक्कम जप्त झाली. निकालानंतर राजकीय पीछेहाट झालेल्या दर्डा भाजपममध्ये प्रवेश करणार काय, याचीही चर्चा रंगली होती. ही हवा कायम असतानाच शनिवारी दर्डा यांचे निमंत्रण स्वीकारून शहा हे दर्डा कुटुंबीयांच्या भेटीस जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. या भेटीच्या अनुषंगाने दर्डा यांच्या निवासस्थानापुढे पोलिसांनी बंदोबस्तही लावला होता. परंतु प्रत्यक्षात शहा यांनी ही भेट टाळली. पत्रकारांची भेट घेऊनच ते दिल्लीला परतले.
तत्पूर्वी, शहा यांनी दौलताबाद येथील हनुमान मंदिरात अभिषेक केला, तसेच भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. जैन मुनी विजयरत्नसुंदरसुरी महाराज यांचीही शहा यांनी भेट घेतली.
दरम्यान पक्ष बदलण्याबद्दलच्या वावडय़ा फेटाळत दर्डा म्हणाले, की मी पक्ष बदलणार नाही. पण यापुढे पक्षात किती सक्रिय असेन हे देखील अद्याप ठरवलेले नाही.