लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीवरुन शिवसेना आणि भाजपात असलेले मतभेद अखेर दूर झाल्याचे समजते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज (सोमवारी) मुंबईत येणार असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते. या भेटीनंतर शिवसेना- भाजपाकडून संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून युतीबाबत आणि शिवसेनेच्या अटींबाबत विविध चर्चा सुरू आहे. राज्यात मोठ्या भावाची भूमिका मिळावी आणि १९९५ प्रमाणे सत्ता वाटपाचे सूत्र असावे, अशा अटी शिवसेनेने घातल्याने आणि मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रही भूमिका घेतल्याने युती रखडल्याचे सांगण्यात येत होते. अखेर शिवसेनेला राजी करण्यात भाजपाला यश आल्याचे समजते.

अमित शाह आज मुंबईत येणार असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान युतीवर शिक्कामोर्तब होईल आणि याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, युतीबाबत चर्चा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर गेले होते. त्यापूर्वी जनता दल संयुक्तचे नेते प्रशांत किशोर हे देखील मातोश्रीवर गेले होते.