सरसंघचालकांशी चर्चा; उमा भारतींचीही भेट

 नागपूर : भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि विश्व हिंदू परिषदेचे नवे अध्यक्ष विष्णू कोगजे या नेत्यांनी बुधवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. भाजप आणि विहिंपच्या राष्ट्रीय नेत्यांनी एकाच दिवशी सरसंघचालकांशी चर्चा केल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया हे भाजपवर नाराज आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तोगडियाकडून भाजपला होणारे नुकसान कमी करण्यासाठी अमित शहा आणि कोगजे यांनी सरसंघचालकांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे.

बुधवारी सकाळी विष्णू कोकजे आणि अन्य पदाधिकारी संघ मुख्यालयात आले आणि त्यांनी डॉ. भागवत आणि भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उमा भारती संघ मुख्यालयात पोहोचल्या. त्यांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या पक्ष संघटनेतील बदलांबाबत चर्चा केली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संघ मुख्यालयात पोहोचले. जवळपास चार तास ते तेथे होते. शहा यांनीही आगामी कर्नाटक, छत्तीसगड व मध्य प्रदेश निवडणूक तसेच तोगडिया यांनी भाजप विरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत सरसंघचालक आणि विहिंपने त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.