अजित पवारांसोबत मी जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचे शिल्पकार अमित शाहच होते असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. मात्र आम्ही अर्ध्या रात्री फोन करु शकतो ते अमित शाह यांना. कारण सगळ्या गोष्टी आम्ही मोदीजींपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आमचा खूप चांगला संपर्क आहे. तसंच मागची पाच वर्षे आणि आजही आमच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ‘कोलाज विथ राजू परुळेकर’ या मुलाखतीत ते बोलत होते.

आणखी वाचा- सगळे पाठीत खंजीरच खुपसत होते… त्यामुळेच अजित पवारांसोबतच्या शपथविधीचा गनिमी कावा केला – फडणवीस

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. कारण शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतला होता. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जेव्हा शिवसेनेला पाठिंबा द्यायचं नक्की केलं तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय आज मागे वळून पाहतो तेव्हा तो नसता घेतला असता तर चाललं असतं. मात्र त्यावेळी तो मला योग्य वाटला होता. पाठीत सगळेच खंजीर खुपसत असल्यावर राजकारणात जिवंत राहण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “जेव्हा कुणाला माहिती नव्हतं तेव्हा मुख्यमंत्री झालो, पण…”; फडणवीसांनी व्यक्त केली सल

त्यावेळी अमित शाह यांना काय घडलंय याची अर्ध्या रात्री कल्पना दिली होती. त्यानंतर त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी घडल्या. पहाटे अजित पवारांसोबत जो शपथविधी झाला त्याचे शिल्पकार अमित शाह हेच होते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आणखी वाचा- …तरच भाजपाला राज ठाकरेंसोबत जाणं शक्य; फडणवीसांचा सूचक इशारा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर जे काही रामायण-महाभारत घडलं ते सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. खरंतर जनतेने कौल दिला होता तो भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीला. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्री आमचाच होणार, अडीच वर्षांसाठीची मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली. एवढंच नाही तर त्यानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात कलगीतुराही रंगला आणि त्यांची युतीही तुटली. याच सगळ्या घडामोडी सुरु असताना आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं एकत्र येणं निश्चित झालेलं असताना एक दिवस पहाटे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांनाच धक्का बसला. मात्र हे सरकार टीकलं नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्त्वात आलं. आज झालेल्या मुलाखतीत जेव्हा याच शपथविधीबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह होते असं सांगितलं आहे.