चंद्रकांत खैरेही केंद्रात मंत्री झाले असते, तर मराठवाडय़ाला त्याचा मोठाच फायदा झाला असता. सगळीकडे अच्छे दिन आले खरे. परंतु तुमच्यावर ही अशी वेळ आली, असा जोरदार टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना लगावला. पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास शुक्रवारी झालेला प्रारंभ या राजकीय धुळवडीनेच रंगतदार ठरला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या साक्षीने उभय नेत्यांमधील टोलेबाजीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, राज्यातील सत्तास्थापनेतील आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळच्या घडामोडी या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात भाजप, शिवसेनेचे नेते, लोकप्रतिनिधींनी एकत्रित हजेरी लावली. मात्र, यातही नेत्यांच्या टोलेबाजीने उपस्थितांची करमणूक केली. शिवसेना आमदार व कारखान्याचे संचालक संदीपान भुमरे यांनी सुरुवातीलाच याची चुणूक दाखविली. भाजप सरकारला विनंती आहे, की काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा. चांगले प्रशासन आणा व साखर कारखानदारी टिकविण्यास मदत करा, असे ते म्हणाले. संत एकनाथ हा कारखाना नेत्यांचा नाही, तर शेतक ऱ्यांचा आहे. यात कुठलेही राजकारण उपयोगाचे नाही. विकासासाठीच आम्ही भाजप नेत्यांसोबत व्यासपीठावर आलो आहोत, असे सांगून शहा यांचे कौतुक करायला ते विसरले नाहीत.
भुमरे यांची री ओढत खासदार खैरे म्हणाले, की आम्ही कार्यक्रमाला आलो, कारण कारखाना व संचालक मंडळ आमचे आहे. भाजप नेते आले असले, तरी कारखाना सुरू राहायला पाहिजे, म्हणून आम्हीही आलो. राष्ट्रवादीने अनेक कारखाने बुडवले. केंद्रात आपले सरकार आहे. आम्हीही एनडीएमध्ये आहोत. शेतक ऱ्यांना मदत देण्याविषयी शहा यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना सांगावे. दुष्काळपीडित जनतेला मदत करण्याची विनंतीही खैरे यांनी शहा यांना केली. शहा यांची उपस्थिती व खैरेंची विनंती हा धागा पकडून दानवे यांनी खरे तर सगळीकडे अच्छे दिन आले असले, तरी तुमचेही अच्छे दिन येतील असा टोला हाणला. हा कारखाना शिवसेनेचा आहे. आम्ही हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही कारखाने चालवा, आम्ही सरकार चालवतो, असा बाणही त्यांनी मारला. शहा यांना मी हात लावला. माझी चांदी झाली. खैरे यांनीही शहांना हात लावावा. त्यांचेही सोने होईल, अशी फिरकीही दानवे यांनी घेतली.
शहा यांनीही या टोलेबाजीत रंग भरले. खैरे व भुमरे यांना कोणी त्रास देऊ नये, या साठी मी आधीच स्पष्ट करतो, की हा राजकीय कार्यक्रम नाही. सेनेच्या नेत्यांसह एकाच व्यासपीठावर आल्याने सेना पक्षप्रमुखांना उद्देशून शहा यांनी हे भाष्य केले, हे लपून राहिले नाही. या मंचावर कोणीही कोणाचे स्वागत करू शकतो. त्यामुळे काही फरक पडत नाही. मीही तुमचे स्वागत करण्यास तयार आहे. शिवसेना असो की भाजप, येथे सगळे शेतक ऱ्यांसाठीच आले आहेत, असा मार्मिक टोलाही शहा यांनी लगावला.