‘राष्ट्रवादी’मध्ये इतर पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरू

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षातून होणारे प्रवेश राष्ट्रवादीमध्ये सुरू झाले असून, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र‘ करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. डॉ. कोल्हे यांना शिरुरमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना उपनेते डॉ. कोल्हे यांच्यासह जालन्यातील बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण, नंदुरबारमधील भाजपचे नेते यश पाटील आदींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे प्रभावी उमेदवार नव्हता. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव होता. पण दिलीपरावांनी लोकसभा लढण्यास असमर्थतता व्यक्त केली होती. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावरील मालिकांमुळे प्रसिद्ध झालेले डॉ.अमोल कोल्हे यांना पक्षाने गळाला लावले. त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार आहे. पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारण्यास तयार असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

देशाच्या राजकारणात सध्या मोठय़ा प्रमाणावर अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशा देण्याची गरज आहे. ही जाणीव शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये आहे. म्हणूनच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. शिवसेनेत चांगला मान-सन्मान मिळाला. याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे त्यांनी आभार मानले. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळेच शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी भाजपमधून स्वगृही परतले. ‘भाजपमध्ये कोणाच्याच मताला किंमत दिली जात नाही. सामान्य जनतेची कामे होत नाहीत. नेतृत्वाचे लक्ष वेधूनही उपयोग होत नाही‘, असे चव्हाण यांनी सांगितले.

अन्य पक्षातून राष्ट्रवादीत येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इतर पक्षातील आणखी काही मोठे नेते राष्ट्रवादीत दाखल होतील, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.