महाविकास आघाडीमध्ये बिघाडी कोण करतय? याच्यात कोणी बिघाडी केली? आणि उलट आरोप करता की आम्ही बिघाडी केली. पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडीच काम राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे आणि दिलीप मोहिते करत आहेत, अशी टीका काल शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली होती. त्यावरुन आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली बाजू मांडली आहे. महाविकास आघाडी सरकार सक्षम आणि भक्कम असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आढळराव पाटलांनी केलेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. तसंच महाविकास आघाडीतल्या ‘बिघाडी’बद्दलही ते़ बोलले. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे तिन्ही नेते समन्वयाने महाविकास आघाडीचं काम करत आहेत. तसंच पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचाही एकमेकांशी समन्वय आहे. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला, तरीही महाविकास आघाडीचं सरकार हे सक्षम आहे, भक्कम आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडीचं सरकार हे देशासाठीचं उदाहरण आहे.

हेही वाचा -“….त्यांची संस्कृती कळते,” आढळराव पाटील यांच्या टीकेला अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कायमच आदर आहे. पण त्यांचं नाव घेऊन स्थानिक पातळीवर जर मित्रपक्षांवर टीका होत असेल तर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्राला महाविकास आघाडीचं सरकार दिलं आहे. त्याला कोणी स्वार्थासाठी नख लावू नये. माझ्या विधानाची अकारण खूप मोठी चर्चा झाली. महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर आहे हे दाखवून देण्यासाठी काही शक्ती फार उत्सुक आहेत हेच यातून समोर येत आहे. पण हा मुद्दा स्थानिक पातळीवरचा आहे. थोडंफार भांड्याला भांडं लागणं स्वाभाविक आहे.

आणखी वाचा -शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर -अमोल कोल्हे

“माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्या मनात आदर आहे. संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडतं? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल. हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे ही गोष्ट विसरू नये. महाराष्ट्राचा सरकार हे राज्याच्या हितासाठी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्याला कुणी नख लावण्याचा प्रयत्न करू नये”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. त्यावरुन शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार टीका केली होती.