महापूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत. वारकऱ्यांच्या नावाखाली पूजेला विरोध करणाऱ्या भाजपा कंपनीपासून वारकऱ्यांनी सावध रहावे अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. काही वेळापूर्वीच एक ट्विट करत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठलाची महापूजा होणार आहे. या पूजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. “तुका म्हणे खळ! करु समयी निर्मळ” असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यंदा कार्तिकीच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. आषाढीच्या वेळीही वारीचे स्वरुप हे मर्यादित होते. आता कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र देवस्थानात करण्यात येणारे नित्योपचार मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठीचे आखून दिलेले नियम आहेत त्यानुसार होणार आहेत.

दरम्यान अमोल मिटकरी यांनी भाजपावर घणाघाती टीका करत हे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत असं म्हटलं आहे. तसंच श्री विठ्ठलाच्या महापूजेला विरोध दर्शवणाऱ्या भाजपा कंपनीपासून वारकऱ्यांनी सावध रहावे असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये विविध कारणांमुळे वाद रंगला आहे. मग ते अर्णब गोस्वामी अटक प्रकरण, मंदिरं उघडण्याचा विषय  असो किंवा लव्ह जिहाद प्रकरण असो भाजपाविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा सामना पाहण्यास मिळतो आहे. आता कार्तिकी एकादशीच्या महापूजेवरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाला टोला लगावला आहे. अमोल मिटकरींना भाजपा नेते उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.