मानवी समाजाची घडी नीट राहण्यासाठी एकमेकांमध्ये सलोखा कायम असणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत मूल्य जपण्याऐवजी उसवून टाकण्याचे, खच्चीकरणाचे काम केले जात आहे. या प्रवृत्तींना व्यवस्थेकडून खतपाणी घातले जात आहे. या स्थितीत व्यक्ती, समूह आणि समाज एकमेकांना वेठीस धरत असून ही चिंताजनक बाब आहे, अशी खंत सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केली.

नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत ‘कोण कोणास वेठीस धरते- व्यक्ती की समाज’ या विषयावर अमोल पालेकर यांचे शनिवारी (दि. १०) येथील कुसुम सभागृहात व्याख्यान झाले. पालेकर म्हणाले, नरहर कुरुंदकर नावाची पुण्याई असलेल्या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. गेल्या दशकभरात व्यक्ती आणि समाज या नात्याचे एक नवे दालन उघडले असून, ते म्हणजे सोशल मीडिया. याला समाजमनही म्हटले जाते. आज सिम्बोलिझम आणि टोकोनिझम वाढतो आहे आणि आजच्या तरुणाईची भाषा मीही बोलू लागलो आहे. एकाच व्यक्तीची पाळेमुळे जास्तीतजास्त घट्ट होऊ लागतात त्या वेळी ती व्यक्ती समाजापासून विभक्त होऊ लागते. परस्परविरोधी महाकाय भोवऱ्यात आपण अडकले जात आहोत. सामाजिक अवकाशाचे खासगीकरण हे नवीन द्वंद्व आता सुरू झाले आहे, असे पालेकर म्हणाले. एखादा विचार मला पटला नाही तर त्याबद्दल बोलण्याचा, लिहिण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. पण सरकारविरुद्ध लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची, पत्रकारांची मुस्कटदाबी केली जात आहे यासाठी स्वत:च्या ताब्यातील संपूर्ण यंत्रणा शासन वापरते आहे. विरोध मुळातूनच नष्ट करण्याचा हा प्रकार असून यामुळे समाज वेठीस धरला जात आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

राजकीय नेते हवे तेव्हा, हवे तेथे कोणतीही भडक वक्तव्ये करू शकतात, सोशल मीडियावरूनसुद्धा हवे ते दाखवले जाते. त्यावरही बंधन नाही. मग नाटक व चित्रपटांनाच सेन्सॉर का, असा प्रश्नही पालेकर यांनी उपस्थित केला. या वेळी त्यांनी नरहर कुरुंदकरांप्रति आदर व्यक्त करताना कुरुंदकरांच्या एका पुस्तकातील उतारा वाचून दाखविला. कुरुंदकर गुरुजींच्या विचारांची जाणीव समाजाला झाली तर हीच खरी गुरुजींना आदरांजली ठरेल, असे ते या वेळी म्हणाले. व्याख्यानानंतर त्यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

प्रा. श्यामल पत्की यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार  प्रा. दत्ता भगत यांनी मानले. कार्यक्रमास आमदार अमरनाथ राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, सदाशिवराव पाटील, प्रा. शेषराव मोरे, श्रीकांत देशमुख, डॉ. जीवन पिंपळवाडकर, डॉ. वृषाली किन्हाळकर, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर व राजश्री पाटील आदींसह इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.