अनेक भागांना गारपिटीचा तडाखा

अमरावती : मंगळवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे जिल्ह्यत शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. वीज कोसळल्याने एक जण जखमी झाला तर अंजनगाव सुर्जी तालुक्यात दोन जनावरे दगावलीत.

मंगळवारी रात्री आठ वाजता अचानक वादळ सुरू होऊन पावसाला सुरुवात झाली.  यासोबतच जिल्ह्यत काही ठिकाणी गारपीट झाली. पंधरा ते वीस मिनिटे बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला. अमरावती विभागात सर्वाधिक पावसाची नोंद अमरावती जिल्ह्यत झाली.  विभागात सरासरी ३.७२ मीमी पावसाची नोंद झाली आहेम्  तर अमरावती जिल्ह्यत ६.०७ मीमी, बुलढाणा ५.०३, अकोला १.५३ तसेच यवतमाळ जिल्ह्यत ०.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सात तालुक्यांमध्ये नुकसान

अमरावती जिल्ह्यत वादळी वारा व गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यतील १९ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. १४ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांमध्ये शेती पिकांसह घरावरील छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या. भातकुली तालुक्यात वाठोडा शुक्लेश्वर येथे १.१० हेक्टरमधील लिंबू पिकाचे नुकसान झाले. ढंगारखेडय़ातील दोन घरांवरील टीनपत्रे उडालीत.

अंजनगाव तालुक्यात धनेगाव येथे वीज कोसळून दोन जनावरे दगावली. तर ५६१.७० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. अचलपूर तालुक्यात ६०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. चांदूर बाजार तालुक्यात १६,७१९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. धारणी तालुक्यातील सिनबंध गावात काही घरांवरील टिनपत्रे उडालीत. तिवसा, वरुड, दर्यापूर, चिखलदरा तालुक्यात नुकसानीचा आकडा नाही.

अवकाळी पावसाने वीज वितरणाची शहरात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने वीज वितरण व्यवस्था विस्कळीत केली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तुटल्या आणि वीज खंडित झाली आहे. शिलांगण रोड ते साईनगर परिसरात बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सर्वत्र काळोख झाला. त्यानंतर वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली.

रात्रीच्या अंधारात डांसाचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. वैतागलेल्या नागरिकांनी अखेर वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र, ते कार्यालय बंद दिसली. त्यामुळे अनेकांनी वीज वितरण अधिकाऱ्यांशी सपर्क करून वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत तगादा लावला होता.