महाराष्ट्रात करोनाची स्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याची टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तसंच केंद्राने हस्तक्षेप करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी नवनीत राणा यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना केली आहे. नवनीत राणा यांनी यावेळी कंगना प्रकरणावर भाष्य करत तिने फक्त आपल्याबद्दल बोलावं असा सल्ला दिला आहे.

“करोनाची स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी,” असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. कंगना रणौत आणि शिवसेना वादावर बोलताना नवनीत राणा यांनी म्हटलं की, “तिने फक्त आपल्याबद्दल बोलावं, इतरांबद्दल नाही. बॉलिवूडने तिला सर्व काही दिलं असून त्यावर आरोप करु नयेत”.

आणखी वाचा- देशातील ४२ टक्के मृत्यू फक्त ११ जिल्ह्यात; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांचा समावेश

याआधी नवनीत राणा यांनी शिवेसना खासदार संजय राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. “संजय राऊत यांनी राज्याचा ठेका घेतला आहे का? त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. ते सतत महिलांचा अपमान करत आहेत. त्यांनी आपली मर्यादा साभाळावी,” असं त्यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- तडजोड,लाचारीमुळे व्यवसाय होतो, पण ब्रॅण्ड रसातळाला जातो, संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर निशाणा

“कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांचं राऊतांना समर्थन आहे असं वाटत आहे. जर मुख्यमंत्र्यांचं राऊत यांना समर्थन असेल तर मुख्यमंत्री बाहेर येऊन त्यांचं समर्थन करतील आणि जर त्यांचा राऊत यांना विरोध असेल तर त्यांनी राऊत यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली होती.