अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. सध्याच्या त्यांच्यावर नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्या मुंबईला रवाना झाल्या आहेत. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.खासदार नवनीत राणांना ६ ऑगस्टला करोनाची बाधा झाली. सुरुवातीला अमरावती येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज (गुरुवारी) त्यांना श्वास घेताना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खासदार राणा या मुंबईला महामार्गाने मुंबईला जाणार आहेत. त्या प्रवासाकरिता सुमारे १२ ते १५ तासांचा कालावधी लागणार आहे. सध्या राणा कुटुंबात आमदार रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या यांच्या सह खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही करोनाबाधित आहेत.

नवनीत राणा यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवतो आहे. त्यांच्यावर नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांना मुंबईत नेऊन त्यांच्यावर उपचार सुरु केले गेले पाहिजेत असा सल्ला नागपूरमधील डॉक्टरांनी दिला. त्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने मुंबईला आणण्यात येतं आहे. नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा हेदेखील त्यांच्यासोबत आहेत. मुंबईत डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनीत राणांवर उपचार केले जाणार आहेत.