News Flash

विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाप्रकरणी शिक्षिकेला अटक

शिक्षिकेला अटक करण्यात यश

अमरावती – चिखलदरा येथे एका प्रसिद्ध शाळेत इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या शाळेतील शिक्षिकेच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली आहे. यामुळे पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

चिखलदरा येथे एका निवासी शाळेचे कनिष्ठ महाविद्यालय आणि वसतिगृहदेखील आहे. मेळघाटातील असणारा हा विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. दरम्यान आपल्यावर मागील ४ महिन्यांपासून शाळेतील शिक्षिकेकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचा आरोप पिडीत विद्यार्थ्याने केला आहे. शाळेची संस्था नामांकित असून ही ४२ वर्षिय शिक्षिका कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विषय शिकवते. या संदर्भातील तक्रार संबंधित विद्यार्थ्याने चिखलदरा पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. आरोपी शिक्षिका घटस्फोटीत असून ती अमरावतीमध्ये राहणारी आहे. तिचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तिने मागील चार महिन्यांपासून या विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले असल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

ही शिक्षिका आपल्याला तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी काही गोष्टी सांगत असे. नंतर तिने आपल्याला काही अश्लिल चित्रफितीही पाठवल्या तसेच काही वेळा आपल्यासोबत ग्रंथालयात बळजबरीही केल्याचे विद्यार्थ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय शारीरिक संबंध ठेवण्यासाठीही ही शिक्षिका आपल्यावर दबाव टाकत असल्याचे विद्यार्थ्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून विद्यार्थ्याने ही बाब शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रुप कमांडरला सांगितली आणि त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. आपल्याबाबत तक्रार नोंदविण्यात आल्याचे समजताच या शिक्षिकेने शाळेत येऊन सुटीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर घरी परतत असताना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 8:28 pm

Web Title: amravati teacher abuse 11th standard student complain register in chikhaldara police station teacher arrest
Next Stories
1 अडीच तास वाट पाहून मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच परतले उद्धव ठाकरे
2 संभाजी भिड्यांना दगड मारताना नाही बघितलं – अनिता सावळे
3 शिवसेनेची सत्ता असताना औरंगाबाद महानगरपालिकेला बाळासाहेब ठाकरेंचा विसर !
Just Now!
X