‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी प्रेम किंवा प्रेमविवाह न करण्याची शपथ विद्यार्थिनींना देण्यात आल्याचा प्रकार अमरावतीत घडला होता. आता, शपथ घेणारी एक विद्यार्थिनीच प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात राष्ट्रीय सेवा योजनांच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. यावरुन वादंग झाल्यानंतर शपथ देणाऱ्या शिक्षकांना या प्रकरणी निलंबितही करण्यात आले. त्यानंतर, शिक्षकांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे तासिकांवर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु होते. अशातच आता एका विद्यार्थिनीने अवघ्या दोन आठवड्यांतच घेतलेली शपथ मोडल्याचं समोर आलं आहे. ही विद्यार्थिनी प्रियकरासोबत पळाल्याची माहिती असून तिच्या नातेवाईकांनी चांदुर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका युवकाने फूस लावून मुलीला पळवून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तर, महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

(आणखी वाचा :- मोदी का सोडणार सोशल मीडिया? नेटकऱ्यांच्या भन्नाट रिएक्शनचा महापूर)

काय होती शपथ :- ‘मी अशी शपथ घेते की… माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन, मी प्रेम किंवा प्रेम विवाह करणार नाही…. शिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशीही करणार नाही….सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही….तसेच, मुलीसाठी हुंडाही देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’ अशी शपथ विद्यार्थिनींना देण्यात आली होती.