बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे अमरावती जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्यात शाब्दिक वादविवाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झाल्यानं गोंधळ उडाला. आमदार रवी राणा यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणमारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिवाळीनिमित्त अमरातीच्या बडनेरा येथील एका वृद्धाश्रमात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा हा प्रकार घडला. खासदार नवनीत राणा यांना दिनेश बुब यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. हा वाद नेमका कशामुळे झाला ते मात्र अद्यप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीतील वाद पुन्हा उफाळून वर येत असल्याची चर्चा अमरावतीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रवी राणा प्रत्येकवर्षी दिवाळीनिमित्त येथील मधुबन वृद्धाश्रमात एक कार्यक्रम आयोजित करतात. त्यामध्ये ते मिठाई, फळे आणि कपडे वाटपाचे काम करतात. यावर्षी राणा यांच्यासोबतच शिवसेनेनेही तशाच प्रकारचा कार्यक्रमाचे नियोजन केलं होते. कार्यक्रम सुरू असताना रवी राणा आणि दिनेश बुब समोरासमोर आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांच्या शाब्दिक चकमकीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी रवी राणा यांनी माईक देखील उगारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिनेश बुब यांनी राणा यांना शिवीगाळ केल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.