अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेवरुन शिवसेनेने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अमृतसरच्या रेल्वे रुळांवर जे घडले, त्या रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या करुण किंकाळ्याच होत्या. सिग्नल यंत्रणा, तडे गेलेले रूळ, वेळापत्रक सुविधा यांची बोंब असताना राज्यकर्ते ‘बुलेट ट्रेन’च्या नावाने दांडिया खेळतात, अशा शब्दात शिवसेनेने मोदी सरकारचा समाचार घेतला. या दुर्घटनेत रावणाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचाही मृत्यू झाला. पण त्याने अनेकांचे प्राण वाचवले. रावणाने पत्करलेल्या हौतात्म्याची तरी कदर ठेवा, असे शिवसेनेने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाबमधील अमृतसरजवळील जोडा रेल्वे फाटकाजवळ रावण दहन पाहण्यासाठी रेल्वे रुळावर गर्दी जमली होती. यादरम्यान वेगाने आलेल्या एक्स्प्रेसची धडक बसून ५८ जण मृत्यूमुखी पडल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली होती. या पार्श्वभूमीवर ‘सामना’मधून शिवसेनेने मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली. देशात महागाईचा भडका उडाला आहे, पण सामान्य जनतेचे मरण मात्र स्वस्त झाले.जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारी घटना पंजाबात घडली. जालियनवाला बाग इंग्रज राजवटीत घडले, अमृतसरचे हत्याकांड स्वराज्यात घडले. रस्त्यांवरील अपघात, रेल्वे अपघात हे जनतेच्या पाचवीलाच पुजले आहेत. विकास आणि प्रगतीच्या गोष्टी करताना रेल्वे यंत्रणा साफ भंगारात गेली आहे. सिग्नल यंत्रणा, तडे गेलेले रूळ, वेळापत्रक सुविधा यांची बोंब असताना राज्यकर्ते ‘बुलेट ट्रेन’च्या नावाने दांडिया खेळतात. रेल्वे खात्याचे नक्की काय चालले आहे? संरक्षण खात्याचे मंत्री असोत किंवा रेल्वे खात्याचे, ते खरोखरच गांभीर्याने त्यांचे खाते सांभाळत आहेत का? कोणाला कुठेतरी कामधंद्याला चिकटवून टाकायचे अशा पद्धतीने महत्त्वाच्या खात्यांवर मंत्री म्हणून लोकांना चिकटवले आहे. गोयल नामक रेल्वेमंत्री हे कागदावर आहेत, पण रेल्वे रुळांवर आहे का?, असा सवाल शिवसेनेने विचारला.

मंत्र्यांचे होमवर्क कच्चे असते व कच्चे मंत्री फक्त धुरळा उडवतात. त्या धुरळ्यात असे अपघात घडतात. लोकांनीही रुळांवर गर्दी करुन अपघातास आमंत्रण दिले. असे अपघात यापूर्वी झाले व यापुढेही होतील, पण सत्ताधारी मात्र बुलेट ट्रेनच्या धुंदीत जगत असतात. त्याच धुंदीचे हे बळी असल्याची टीका शिवसेनेने केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amritsar railway accident shivsena slams modi government
First published on: 22-10-2018 at 06:18 IST