माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व शिवसेनेतील कलगीतुरा सुरूच आहे. अमृता फडणवीस आणि शिवसेना पुन्हा एकदा समोरासमोर आले असून, इशाऱ्या देणाऱ्या शिवसेनेवर अमृता फडणवीस यांनी बुल्डोजर सरकार म्हणत पलटवार केला आहे.

राज्यात भाजपाचं सरकार पायउतार होऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यापासून अमृता फडणवीस सरकारच्या निर्णयांवर आणि भूमिकांवर टीका करताना दिसत आहे. त्यावरून शिवसेनेचे नेते आणि अमृता फडणवीस यांच्यातील शाब्दिक वाद ट्विटरवर बघायला मिळत आहे.

मंदिरं खुली करण्याच्या मागणीसंदर्भात अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. “वाह प्रशासन! बार आणि लिकर शॉप्स सुरु झाले आहेत मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्याला शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी “आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,” अशी टीका अमृता फडणवीस यांच्यावर केली होती.

त्याला उत्तर अमृता फडणवीस यांनी ट्विट करून उत्तर दिलं आहे. “माझ्याकडे ना घर आहे, ना दार. मग बुल्डोजर सरकार काय पाडणार?,” अशी मार्मिक टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

काय म्हणाल्या होत्या विशाखा राऊत?

“अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना पक्षाची ही चौथी पिढी राजकारणात आहे.आम्हाला काय करायचं हे शिकवू नये आणि आमचं तोंड उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,”