07 March 2021

News Flash

शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणत अमृता यांची टीका; “महाराष्ट्र कुठेही नेऊन ठेवला असो पण बिहार…”

अमृता यांनी शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीवरही अप्रत्यक्षपणे साधला निशाणा

(प्रातिनिधिक फोटो)

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून काम करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या या विजयामुळे कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र त्याचवेळी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या मित्रपक्षांना ठार केलं असा टोला लगावला आहे. अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेचा ‘शवसेना’ असा उल्लेख केला आहे.

अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांनी एनडीएने बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर दिलेल्या मुलाखतीचा एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेने कशाप्रकारे बिहारमधील निवडणुकीमध्ये खराब कामगिरी करत आपलं हसं करुन घेतलं आहे याबद्दल भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधीतरी बिहारमध्ये काही जागा निवडून यायच्या मात्र आता तेही झालं नाही असं म्हणतं शिवसेनेबरोबर सध्या सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीलाही टोला लगावला आहे. याचवरुन अमृता यांनी शिवसेनेने आपल्या साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले अशी टीका ट्विटवरुन केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद,” असं म्हणत बिहारमधील मतदारांचे आभार मानले आहेत.

बिहारमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या शिवसेनेला बिहारच्या मतदारांनी नाकारल्याचे चित्र निकालामध्ये दिसून आलं. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये ५० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला भोपळाही फोडता आलेला नाही.  शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटाला अधिक म्हणजेच १.७४ टक्के मतं मिळाली आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणत महाविकास आघाडीची मोट बांधणाऱ्या राष्ट्रवादीलाही बिहारमध्ये फरसे यश मिळालेले नाही. राष्ट्रवादीला ०.२३ टक्के मतं मिळाली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 1:29 pm

Web Title: amruta fadanvis says shivsena killed the alliance parties in bihar election scsg 91
Next Stories
1 विवाहित प्रेयसीने प्रियकराचे आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे इंटिमेट फोटो मॉर्फ केले त्यानंतर….
2 जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार; म्हणाले…
3 उमा भारती म्हणाल्या, “तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, बिहारचं नेतृत्व करू शकतात; परंतु…”
Just Now!
X