औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वृक्षतोडीला विरोध दर्शवत ‘आरे’तील मुंबई मेट्रोशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. या निर्णयाबद्दल कौतूक होत असतानाच औरंगाबाद शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून शिवसेनेला प्रश्न विचारले जात आहेत. यात माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेवर टीकेचे बाण डागले आहेत.

अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. “ढोंगीपणा हा आजार आहे. गेट वेल सून शिवसेना. झाडं तोडण तुमच्या सोयीनुसार आहे. जर कमिशन मिळत असेल तर झाडं तोडायला परवानगी देणार. हे अक्ष्यम पाप आहे,” अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण –

औरंगाबाद शहरातील एमजीएम विद्यापीठाशेजारी प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. १७ एकर जागेवर हे स्मारक होणार आहे. त्यासाठी ६४ कोटींची निविदा प्रक्रिया विचाराधीन आहे. शासनाकडून ५ कोटी रूपये मिळाले आहेत. निधी उपलब्ध करून देण्याचं शासनाने आश्वासित केलं आहे. हे स्मारक करण्यासाठी तत्कालीन सरकारने हे मंजूरी दिली होती. या स्मारकाच्या कामासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून वादंग उठले आहे.