सोशल मीडियावर अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन अडचणीत येणारी अभिनेत्री पायल रोहतगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबई पोलिसांनी आपल्याला ट्विटरवर ब्लॉक केल्याचं पायलने एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. या पोस्टमध्ये तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टॅगही केलं होतं. तिच्या या पोस्टनंतर अमृता फडणवीस यांनी मध्यस्थी केली असून त्यांच्या सांगण्यावरुन मुंबई पोलिसांनी पायलला अनब्लॉक केल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसापूर्वी पायलने ट्विटरवर मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्याचा एक स्क्रीन शॉट शेअर केला होता. “मुंबई पोलिसांनी मला ब्लॉक का केलं आहे…’मुंबई पोलिसांच्या या पक्षापातानंतर आता मला भारतात राहण्याची भीती वाटू लागली आहे”, असं पायलने या पोस्टमध्ये लिहीलं होतं.


ही पोस्ट करत तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टॅग केलं होतं. सोबतच तिने अमित शहा यांना या संदर्भात इमेलही पाठविला होता. तिच्या या पोस्टची अमृता फडणवीस यांनी दखल घेत एक पोस्ट लिहिली त्यात त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. त्यांच्या या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी पायलला अनब्लॉक केल्याचं सांगण्यात येत आहे.

“एखादा नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून जर त्याचं मत व्यक्त करत असेल, (..आणि ज्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जात नसतील) तर अशा नागरिकाला सार्वजनिक संस्थेने ब्लॉक करणे योग्य नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी लक्ष द्यावे”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

त्यांच्या या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनीही त्यांची बाजू मांडत आपलं स्पष्टीकरण दिलं. “मुंबई पोलीस प्रत्येक नागरिकाच्या पाठिशी नेहमीच उभे राहिले आहेत, पायल रोहतगीचे ट्विटर अकाऊंट सुरु असून आम्ही कोणत्याही नागरिकाशी संवाद तोडत नाही. याप्रकरणी आमची टीम नेमकं काय झालं आहे, याचा शोध घेत आहे”, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, पायल रोहतगी अनेक वेळा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. यापूर्वीदेखील तिने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा राममोहन रॉय यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर तिच्यावर काडाडून टीका करण्यात आली होती.