बांगड्या घातल्या आहेत का अशी टीका करणाऱ्या फडणवीस यांनी माफी मागावी म्हणणाऱ्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. “शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही, अशा शब्दांमध्ये टीका करणाऱ्या फडणवीस यांच्यासंदर्भात ट्विट करणाऱ्या आदित्य यांना ट्विटवरुन अमृता यांनी टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते फडणवीस

एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीस यांनी शिवसेनेवर जाहीर भाषणामध्ये टीका केली. आझाद मैदान येथे मंगळवारी पार पडलेल्या भाजपाच्या राज्य सरकारविरोधातील आंदोलनामध्ये फडणवीस बोलत होते. “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षाने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. भाजपाला जशास तसे उत्तर कशा पद्धतीने देतात हे ठाऊक आहे. आमच्यामध्ये तेवढे सामर्थ्य आहे,” अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली होती.

आदित्य यांचा टोला

फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेच्या वृत्ताची बातमी ट्विट करत आदित्य यांनी फडणवीस यांना सुनावले होते. ट्विटवरुन फडणवीस यांना टॅग करत आदित्य यांनी या बांगड्या घातल्या आहेत या वक्तव्याबद्दल माफी मागावी असं म्हटलं होतं. “देवेंद्र फडणवीसजी, सामान्यपणे मी टीकेला उत्तर देत नाही. मात्र या बांगड्या घातल्या आहेत टीकेबद्दल तुम्ही माफी मागायला हवी. सर्व शक्तीशाली, सामर्थ्यवान महिला बांगड्या घालतात. आपलं राजकारण सुरु राहिलं पण आपल्याला अशापद्धतीने टीका करणं बंद केलं पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांनी अशी टीका करणे अपमानास्पद वाटतं,” असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

अमृता यांचे उत्तर…

अमृता फडणवीस यांनी आदित्य यांचे हेच ट्विट कोट करुन रिट्विट करत आदित्य यांना घरणेशाहीवरुन टोला लगावला आहे. “कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपाच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे,” असं ट्विट अमृता यांनी केलं आहे.

अमृता यांनी अशाप्रकारे शिवसेनेवर किंवा शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी ट्विटवरुन उद्धव ठाकरेंवर अनेकदा निशाणा साधला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis slams aditya thackeray over his demand of apology by devendra fadnavis scsg
First published on: 26-02-2020 at 17:48 IST