व्यावसायिक आणि कलात्मक दोन्ही प्रकारच्या चित्रपटांची सांगड घालत स्वत:ला कलाकार म्हणून सिद्ध करणे हे मोठे आव्हान आजच्या कलाकारांसमोर आहे. ते आव्हान यशस्वीपणे पेलण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरशी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या नव्या पर्वात संवाद साधण्याची संधी रसिकांनी मिळणार आहे.

मराठी चित्रपटांमध्ये ग्लॅमरस, संवेदनशील आणि सक्षम अभिनेत्री म्हणून स्वत:ला प्रस्थापित केल्यानंतर तिथेच न थांबता रिअ‍ॅलिटी शोज, हिंदी चित्रपट आणि वेबसीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमांतून अमृता खानविलकरने चौफेर कामगिरी केली आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अमृता खानविलकरबरोबर ‘के सरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’चे नवे पर्व गुरुवार, ७ मार्चला पुण्यात रंगणार आहे. ‘लागू बंधू’ आणि ‘परांजपे स्कीम्स’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’साठी ‘नोबल हॉस्पिटल’ हे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत. ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटापासून अभिनेत्री म्हणून अमृताचा प्रवास सुरू झाला. ‘साडे माडे तीन’, ‘गैर’, ‘अर्जुन’, ‘बाजी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘कटय़ार काळजात घुसली’सारख्या चित्रपटांमधून अमृताने काम केले आहे. मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून ओळख मिळाल्यावर दोनच वर्षांत अमृताने हिंदीत पाऊल टाकले. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘फुं क’ हा तिचा नायिका म्हणून पहिला हिंदी चित्रपट. त्यानंतर तिने ‘फुंक २’मध्येही काम केले होते.

अभिनेत्री म्हणून भूमिकांच्या बाबतीत चोखंदळ असणाऱ्या अमृता खानविलकरने केवळ चित्रपटांपुरते स्वत:ला मर्यादित ठेवले नाही. हिंदीत ठरावीक भूमिका न करता मध्यंतरीच्या काळात तिने ‘नच बलिए’सारख्या रिअ‍ॅलिटी शोवर भर दिला. ती या शोची विजेती ठरली आणि त्यानंतर परीक्षक म्हणून तिने काही शोजचे काम पाहिले. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ आणि मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांमधून तिने केलेल्या भूमिकांनंतर वेबसीरिजसारख्या नव्या माध्यमातूनही ती स्वत:ला आजमावते आहे. आपल्या अभिनय कलेच्या जोरावर संयमाने एकेक पायरी पुढे जात अभिनेत्री म्हणून कारकीर्द घडवणाऱ्या अमृताचे अनुभव, तिचा संघर्ष तिच्याचकडून ऐकण्याची संधी ‘व्हिवा लाऊंज’च्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहे.

  • कधी – ७ मार्च
  • कुठे – हॉटेल श्रेयस, १२४२ बी, आपटे रोड, डेक्कन जिमखाना, पुणे.
  • वेळ – सायंकाळी ५.४५ वाजता.
  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.