शहर बससेवेच्या (एएमटी) कंत्राटदारावर मनमानीचा ठपका ठेवत महानगरपालिकेच्या स्थायी समितीची या विषयावरील सभा सोमवारी तहकूब करण्यात आली. ही सभा आता उद्या (मंगळवार) होणार आहे. दरम्यान या कंत्राटदाराला नुकसान भरपाई देण्यास विरोधी सूरच सदस्यांनी व्यक्त केला असून या कराराच्या वैधतेबाबतच विविध मुद्दे पुढे आले आहेत.
एएमटीची कंत्राटदार कंपनी प्रसन्ना पर्पलने या सेवेत येत असलेल्या तोटय़ाबाबत मनपाकडे मासिक ७ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली असून, अन्यथा सोमवारपासून ही सेवा बंद करण्याची नोटीस कंपनीचे प्रतिनिधी परदेशी यांनी गेल्या दि. १३ ला दिली होती. त्यावर आज स्थायी समितीची विशेष सभा बोलवण्यात आली होती. सामितीचे सभापती किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी, मनपाला नोटीस देणारा एएमटीचा संबंधित प्रतिनिधी हेच या सभेला अनुपस्थित होते.  
स्थायी समितीचे सदस्य दीप चव्हाण यांनी सुरुवातीलाच या सभेला आक्षेप घेतला. अन्य महत्त्वाचे विषय सोडून या विषयावर तातडीची सभा घेताना सदस्यांनी त्याबाबतची कागदपत्रेही उपलब्ध करून न दिल्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. कोणतीही निवडणूक, शाळा सुरू होण्याची वेळ असे निमित्त साधून एएमटीचा कंत्राटदार मनपा व पर्यायाने नगरकरांना वेठीस धरत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या सेवेसाठी करण्यात आलेला करारच बेकायदेशीर असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. या कराराचे सभेत तर्पण करण्यात आले. या करारातच अनेक उणिवा असल्याचे या वेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
कंत्राटदार कंपनीच्या वतीने दीपक मगर हे या सभेला उपस्थित होते. त्यालाही सदस्यांनी आक्षेप घेतला. नोटीस देणारी व्यक्ती वेगळी, सभेला येणारी व्यक्ती वेगळी, मगर यांना याबाबतचे अधिकार आहेत का, असा सवाल करून याबाबतही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटदाराच्या मागणीनुसार त्याला सध्या मासिक २ लाख ९३ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. त्याने आता सात लाख रुपयांची मागणी केली असली तरी, पूर्वीच्या २ लाख ९३ हजार रुपयांच्या निर्णयालाच स्थायी समितीने आक्षेप घेतला. ही गोष्टही बेकायदेशीर असल्याचे सांगून त्याबाबतही सदस्यांनी खुलासा मागितला आहे. बराच वेळ चाललेल्या या चर्चेनंतर अखेर स्थायी समितीची ही सभा तहकूब करण्यात आली, ती आता उद्या (मंगळवार) बोलावण्यात आली आहे.