News Flash

भगवा फडकवीत ठेवण्याचे सेनेपुढे आव्हान!

यवतमाळ जिल्हा हा पारंपारिकदृष्टय़ा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक

| September 15, 2013 02:26 am

खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले
‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारा मध्ये..
पुढील रविवारी
नांदेड, अमरावती

भगवा फडकवीत ठेवण्याचे सेनेपुढे आव्हान!
यवतमाळ जिल्हा हा पारंपारिकदृष्टय़ा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. यवतमाळ आणि वाशिम हे दोन वेगवेगळे लोकसभेचे मतदारसंघ होते. दोन्ही मतदारसंघांवर काँग्रेसचे वर्चस्व होते. वाशिममधून काश्मिरमधील नेते गुलामनबी आझाद हे दोनदा निवडून आले होते. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यांना भाजप आणि शिवसेनेने धक्का दिला. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर गेल्या निवडणुकीत यवतमाळ-वाशिम हा एकच मतदारसंघ तयार झाला. वाशिममधून पुंडलिक गवळी व नंतर त्यांची कन्या भावना गवळी हे निवडून आले. यवतमाळमध्ये २००४च्या निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ राठोड हे निवडून आले होते. अणुकरारावरील मतदानात त्यांची भूमिका संशयास्पद ठरली आणि भाजपने दूर केलेल्या राठोड यांना काँग्रेसने २००९च्या निवडणुकीत उमेदवारी दिली. मात्र शिवसेनेच्या भावना गवळी यांनी लोकसभा प्रवेशाची हॅटट्रिक साधली. यवतमाळ जिल्’ाातील सातपैकी पाच आमदार हे काँग्रेसचे आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे सुद्धा याच जिल्ह्य़ातील. यंदा कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच या दृष्टीने काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. भावना गवळी यांच्याबद्दल मध्यंतरी बऱ्याच वावडय़ा उठत होत्या. त्यातच राष्ट्रवादीचा या मतदारसंघावर डोळा आहे.  विधिमंडळातील मौनी मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनोहरराव नाईक यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची राष्ट्रवादीची योजना आहे.
माजी खासदार राठोड हे बाशिंग बांधून तयार असले तरी ते निवडून येण्याबाबत साशंकता असल्याने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीच निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव आहे. एकूणच राजकीय त्रांगडे असले तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील जागा कायम राखणे शिवसेनेला यंदा सोपे नाही.
लोकसभा मतदारसंघ : यवतमाळ-वाशीम
विद्यमान खासदार : भावना पुंडलिकराव गवळी, शिवसेना.
मागील निकाल : काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा ५७ हजार मतांनी पराभव

मतदारसंघातील कामगिरी :
*असाध्य आणि संसर्गजन्य रोगांची नियंत्रण करण्यासाठी वाशीम येथे पथदर्शी प्रकल्प
*पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत १०७ कोटी रुपयांची कामे. कळंब, बाभूळगांव तालुक्यात जलशुद्धीकरण प्रकल्प
*‘शंकुतला’ ही यवतमाळ-मूर्तिजापूर नॅरोगेज रेल्वे सुरू करण्यात यश
*नवीन लहान मोठया पुलांची जवळपास १९ कामे पूर्ण

लोकसभेतील कामगिरी
*सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न-३४० (तारांकित ३६ अतारांकित ३०४)
*एकूण १७ वेळा चर्चेत सहभाग ’एकूण हजेरी- २३५ दिवस (३३५ दिवसांपैकी)

जनसंपर्क
भावना गवळी यांनी यवतमाळ आणि वाशीम या दोन्ही शहरात जनसंपर्क कार्यालय उभारले आहेत. अद्ययावत सोईनी युक्त या कार्यालयात अनेक कर्मचारी आहेत. नागरिकांच्या मागण्या निवेदने आदींची नोंद ठेवणे त्याचा मागोवा घेणे, नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे ही गवळींची जनसंपर्काची पद्धत आहे. महिला खासदार असल्याने दरवर्षी मतदारसंघातील किमान ३ लाख भावांना राखी पाठवतात.

महत्त्वाचे प्रश्न :
*कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून देणाऱ्या येणाऱ्या रकमेत वाढ करणे
*कोळसा खाणी वितरणातील अनियमितता आणि घोटाळ्यांच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशीची करणे
*यवतमाळ-वाशिम मतदार संघातील रेल्वे सुविधा तसेच पिण्याच्या पाण्याचा मुद्यावर चर्चा. विदर्भात शेतकऱ्यांना खते उपलब्ध करुन देणे
*यवतमाळ-वाशिममध्ये आदिवासी बहुलभागात डॉक्टरांच्या तुटवडय़ाचा मुद्दा उपस्थित केला

अनेक प्रश्न मार्गी लावले
मतदारसंघात पायाला भिंगरी लावून मी फिरत असते, हे विरोधकही मान्य करतील. रस्ते विकास, कृषी, शिक्षण, आरोग्य विशेषत: कापसाला भाव मिळावा, यासाठी आंदोलने केली. टेक्सटाईल पार्क उभारणे, यवतमाळ -मूर्तीजापूर या शंकुतला रेल्वे चे ब्रॉडग्रेजमध्ये रुपांतर करणे, वर्धा-नांदेड-व्हाया यवतमाळ या नव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करणे, अमरावती विद्यापीठाचे वाशीम येथे उपकेंद्र सुरु करणे, अशी काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.     
भावना गवळी

प्रश्नांची जाणच नाही
आदिवासी, विमुक्त भटके, बंजारा, मुस्लिम, अनुसूचित जाती-जमातींसाठी गवळी यांनी काहीही केले नाही. या जमातींच्या प्रश्नांची जाण त्यांना नाही. विकासकामे त्यांनी केली असती तर यवतमाळ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या पारवेकर निवडून आल्या नसत्या. ही पोटनिवडणूक म्हणजे ट्रेलर होता. खरा सिनेमा २०१४ मध्ये दिसणार असून जनतेच्या नाराजीची कल्पना गवळींना आहे.
हरिभाऊ राठोड  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 2:26 am

Web Title: an account of member of parliament shiv sena faces challenge to keep yavatmal washim constituency
Next Stories
1 मनपा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडीच व्हावी- आदिक
2 साईबाबाकडे फुटीरवाद्यांशी समन्वयाचे काम
3 पुण्याजवळ ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
Just Now!
X