यवतमाळ  जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह  रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याबरोबच मृत्यू संख्याही वाढत आहे. आज शनिवारी जिल्ह्यात एका सैनिकासह वृद्धाचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २५ वर पोहचली आहे. दरम्यान आज १० नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे आतापर्यंतची एकूण रूग्णसंख्या ७१८ वर पोहचली आहे.

आज मृत्यू झालेल्या दोघांमध्ये यवतमाळ शहरातील भोसा रोडवरील ४८ वर्षीय सैनिक आणि उमरखेड शहरातील वॉर्ड क्रमांक एक मधील ६५ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. यवतमाळातील मृत सैनिक काही दिवसांपूर्वीच कर्तव्यावरून पश्चिम बंगालमधून घरी परतले होते.  त्यांना ताप, सर्दी अशी लक्षणे होती. प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर होऊन शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १० जणांमध्ये सहा पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. यात घाटंजी शहरातील तीन पुरुष व दोन महिला, मारेगाव शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील एक महिला यांचा समावेश आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २४२ वर पोहचली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे १६५ तर ‘रॅपीड ॲन्टीजन’ चाचणीद्वारे ७७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१८ झाली आहे. यापैकी ४५१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात २५ जण करोनामुळे दगावले आहेत. सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात ८१ संशयित भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ४९० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.