आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जपली पाहिजे या उद्देशाने सगळ्या विद्यापीठातील आणि महाविद्यालयांमधील सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीतानेच करावी, असा निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत होत असते. आपला देश स्वतंत्र व्हावा यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. याची आठवण विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. तसंच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण झाली पाहिजे यासाठी विद्यापीठं, महाविद्यालये या ठिकाणी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीतानेच झाली पाहिजे अशीही भूमिका त्यांनी मांडली. आपल्या मातृभाषेचा अभिमान आपल्याला असायला हवा. सगळ्या महाविद्यालयांच्या नावांचे फलक मराठीतच लावण्यात यावेत यासाठीच्या सूचनाही महाविद्यालयांना देणार असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.