‘‘पुण्याहून मुंबईला परतत असताना गाडी आनंदसाहेबांनी चालवायला घेतली. ‘मी गाडी चालवितो. तुम्ही शेजारी बसून आराम करा’, असे मी दोनतीनदा त्यांना म्हणालो खरा. पण, ते ड्रायव्हिंग सीटवरून उठले नाहीत आणि उठले ते असे की परत आलेच नाहीत..’’ डोळ्यांच्या कडांमध्ये आलेल्या अश्रूंना वाट करून देत सुरेश पाटील सांगत होता. पुण्याला ही त्यांची शेवटची भेट ठरेल, असे वाटलेच नाही, असेही तो म्हणाला.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या अपघातात आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे या अभिनेत्यांसह प्रत्युष हा अक्षयचा दोन वर्षांचा मुलगा यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेचा साक्षीदार असलेला सुरेश पाटील हा आनंद अभ्यंकर यांच्या गाडीचा चालक अजून पुरता सावरलेला नाही. सुरेश याच्यासह अक्षय यांची पत्नी दीप्ती पेंडसे हे दोघे या अपघातामध्ये बचावले आहेत. मात्र, आपली कोणतीही चूक नसताना झालेल्या तीन जणांच्या दुर्दैवी मृत्यूने हे दोघेही हादरले आहेत. सुरेश हा मूळचा मुंबईच्या कांदिवलीचा. दहावीपर्यंत शिक्षण झालेला सुरेश गेल्या सहा महिन्यांपासून आनंद अभ्यंकर यांच्या गाडीचा चालक म्हणून काम करीत आहे.
 सुरेश पाटील म्हणाला, रविवारी पहाटे साडेपाच वाजता मी आणि आनंदसाहेब पुण्याला येण्यासाठी निघालो. खालापूरच्या टोल नाक्यापर्यंत मी गाडी चालविली. त्यानंतर आनंदसाहेबांनी गाडी चालविण्यास घेतली ती थेट कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणापर्यंत तेच गाडीचे चालक होते. तेथे दिवसभर चित्रीकरणामध्ये त्यांनी भाग घेतला. रात्री नऊ वाजता चित्रीकरण संपल्यानंतर ते घरी आई-वडिलांना भेटू असे म्हणाले. आनंदसाहेबांनी नुकतीच व्ॉगन आर गाडी घेतली आहे. ही गाडी दाखविण्यासाठी आम्ही कोथरूडच्या डहाणूकर कॉलनी येथील त्यांच्या घरी गेलो. आई-वडिलांशी गप्पा झाल्यावर थोडय़ाच वेळाने आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो. आनंदसाहेबांच्या घरी अक्षय पेंडसे, त्यांच्या पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा आले होते. ‘आपण मुंबईला एकत्रच जाऊयात’, असे आनंदसाहेब अक्षय यांना म्हणाले होते. मी गाडी चालवित होतो. मित्रांशी गप्पा मारण्यासाठी आनंद साहेब पाचदहा मिनिटे थांबले होते. त्यांनतर त्यांनी गाडी चालविण्यासाठी घेतली. टोल नाका पार करून सात किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर समोरून भरधाव आलेल्या टेम्पोने धडक दिली. आमची गाडी मधल्या लेनमध्ये होती आणि वेग देखील ८० पेक्षा अधिक नव्हता. अकरानंतर समोरून भरधाव  आलेल्या टेम्पोने धडक दिली आणि काही कळण्याच्या आतच उजवीकडील बाजूचे दोन्ही दरवाजे गाडीपासून वेगळे झाले. आनंदसाहेब, त्यांच्यामागे बसलेले अक्षय आणि त्यांच्या मांडीवर असलेला मुलगा असे तिघेही गंभीर जखमी झाले. मी अभ्यंकर यांच्या पत्नीला दूरध्वनी केला. काही क्षणातच त्यांचे कौटुंबिक मित्र जयंत गोडबोले यांचा मला दूरध्वनी आला. त्यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने काही वेळातच घटनास्थळी रुग्णवाहिका येतील अशी व्यवस्था केली. आनंदसाहेबांच्या नाका-तोंडातून वाहणारे रक्त मी तीनदा पुसले. दरम्यानच्या काळात अक्षय यांच्या पत्नीने मला या तिघांना गाडीबाहेर काढण्यासाठी मदत केली.
इतका वेळ धीराने घेणाऱ्या वहिनींनी त्यांचे कुटुंबीय आल्यानंतरच त्यांनी आपले दुख व्यक्त केले. या तिघांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ते बरे होतील अशी आशा होती. पण, काळाने त्यांना हिरावून नेले. मी गाडी चालविली असती, तर कदाचित आनंदसाहेबांचा जीव वाचला असता.