शिवसेना राज्यात सत्तेत आल्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. रायगड जिल्ह्य़ातील इतर पक्षीय कायकत्रे शिवसेनेचा आधार घेताना दिसत आहेत. जिल्ह्य़ातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचे मातब्बर नेते आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केला.
तालुक्यातील परहुर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण ना. गीते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या वेळी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल, एक हाती सत्ता शिवसेनेची येईल, असा आशावाद अनंत गीते यांनी व्यक्त केला.
२००९ च्या निवडणुकीत शेकाप, शिवसेना, भाजप आणि आरपीआय आठवले गट अशी महाआघाडी होती. त्या वेळी बॅ. अंतुले यांचा पराभव करून मी खासदार झालो, परंतु या वेळी तुमच्याशिवायसुद्धा खासदार होऊ शकतो, हे दाखवून दिले, असा चिमटा शेकापचे नाव न घेता काढला. परहुर पाडा हे गाव आमदार सुनील राऊत यांनी दत्तक घेतले आहे.
पुढील पाच वर्षांत जवळपास १० कोटींचा निधी त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मिळेल. त्यातून विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
दिघी-रोहा रेल्वेने जोडणार असून दिघी-पुणे-माणगांवचे चौपरीकरण, वाकण ते खोपोली रस्त्याचे चौपदीकरण होणार असून, वडखळ-अलिबागच्या चौपदीकरणाचे भूमिपूजन आणि उद्घाटन ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आणि आपल्या हस्ते पार पडेल, असे गीते यांनी या वेळी सांगितले.
शिवसेनेचे सचिव तथा रायगडचे संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांनी आपल्या भाषणात ‘शिवसेना’ या चार अक्षरांवर विश्वास ठेवा, असे आवाहन केले. आ. सुनील राऊत, शिवसनेचा नेते महेंद्र दळवी यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सरपंच प्रफुल्ल पाटील, मानसी दळवी, प्रकाश देसाई, दीपक रानवडे आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते.