ज्यांनी ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला, ज्यांनी शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी कवडीमोल दराने विकत घेतल्या, बेनामी कंपन्या काढून मनी लॉण्ड्रिंग केले आहे, असा खासदार रायगडचा नसावा. तो  सदाचारी आणि निष्कलंक असावा, त्यामुळे भ्रष्टाचारी प्रवृत्तींना गाढण्यासाठी मी पुन्हा एकदा रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. ही लढाई भ्रषाचार विरुद्ध सदाचाराची असणार आहे, धुरंधर राजकारणाची पिल्लावळ रोखण्यासाठी पुन्हा एकदा साथ द्या असे आवाहन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी अलिबाग येथे केले. अनंत गिते यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर कुरुळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे रायगड प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, आमदार भरत गोगावले, आमदार निरंजन डावखरे, बाळासाहेब पाटील यांच्यासह शिवसेना-भाजपचे प्रमुख पादाधिकारी उपस्थित होते.

माझा लढा काँग्रेस आणि शेकापच्या कार्यकर्त्यांशी नाही. माझा लढा हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाईट प्रवृत्तींशी आहे. सेना-भाजपची युती ही लोकसभेसाठीच नव्हे तर विधानसभेसाठीही झाली आहे. त्यामुळे आम्ही पुढील विधानसभाही एकत्रित लढणार आहोत. राष्ट्रहितासाठी आमचे मनोमीलन झाले आहे. याउलट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्यातील आघाडी ही नेत्यांची आघाडी आहे. त्यामुळे कार्यकत्रे आणि मतदार आमच्या पाठीशी उभे राहतील.

बॅरिस्टर अंतुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस वाढवली. ते कोकणचे भाग्यविधाते होते. पण त्यांच्यामुळे काही लोक मोठे झाले आणि नंतर त्यांनी अंतुलेंशी गद्दारी केली, अशा गद्दारांना रायगडातून हद्दपार करण्याची वेळ आली असल्याचेही गिते या वेळी म्हणाले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. बँकेतील भ्रष्टाचारविरोधात आता आम्ही रान उठवणार असल्याचेही त्यांनी या वेळी बोलताना सांगीतले.

देशहितासाठी शिवसेना-भाजपा युती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे. देशाला आणि राज्याला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचविण्यासाठी अनंत गिते यांच्यासारखे खासदार निवडून आले पाहिजेत, असे सुभाष देसाई म्हणाले.

तर गेल्या निवडणुकीत मी अनंत गिते यांचे काम केले नव्हते, पण या निवडणुकीत मी गिते यांचे मनापासून काम करणार आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना दापोली मतदारसंघातून १७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. या वेळी विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ अशी ग्वाही रामदास कदम यांनी या वेळी दिली. कोकणी माणसांनी शिवसेना मोठी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणी जनता गिते यांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या पाच वर्षांत अनेक शासकीय योजना या मतदारसंघात यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्यामुळे गिते यांना मत मागण्याचा अधिकार त्यांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी गिते यांना निवडून आणायचे आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसनिकांच्या खांद्याला खांदा लावून काम कारावे, असे आवाहन प्रशांत ठाकूर यांनी केले.

ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध सादाचार अशी आहे. भ्रष्टाचाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. भ्रष्टाचाऱ्यांना गावात थारा देऊ नका. प्रत्येकाने आपले काम चोख बाजावाल्यास अनंत गिते निवडून येण्यात कोणतीच अडचण येणार नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा शिवसेना पक्ष आहे. त्यामुळे मी या पक्षात प्रवेश केला आहे. मला खात्री आहे की अनंत गिते हेच या मतदारसंघाचा विकास करू शकतील, असे नविद अंतुले म्हणाले.