26 September 2020

News Flash

भंडारा जिल्हय़ातही महापाषाणयुगीन शिलास्तंभाची नोंद

डोंगरगाव येथे ५०, नवखळा येथे १४, कोरंबी येथे २८ शिलास्तंभ मिळाले होते.

चांदी गावाजवळ मिळालेले महापाषाणयुगीन शिलास्तंभ.

चंद्रपूर : भंडारा जिल्हय़ातील पवनी तालुक्यापासून साधारण १७ किलोमीटर दक्षिणेकडील चांदी गावानजीकच्या जंगलात लोहयुगीन, महापाषाणयुगीन बृहदाश्मयुग काळातील ११ स्लॅबवर्तुळे, दोन शिलावर्तुळे, चार शिलापेटिका व दोन शिलास्तंभ आढळले आहेत. इतिहास अभ्यासक अमित भगत यांना शोधमोहिमेदरम्यान हे अवशेष आढळले असून त्यांच्या मते यांचा कालखंड साधारण इसवी सन पूर्व १५०० ते इसवी सन पूर्व २०० या दरम्यान असावा.

भगत यांनी यापूर्वीसुद्धा चंद्रपूर जिल्हय़ातील नागभीड परिसरात बृहदाश्मयुगीन संस्कृतीची डोंगरगाव, नवखळा, कोरंबी व बनवाही ही स्थळे शोधून काढली होती.

डोंगरगाव येथे ५०, नवखळा येथे १४, कोरंबी येथे २८ शिलास्तंभ मिळाले होते. त्यानंतर बनवाही गावाजवळील जंगलात १५ ते २० शिलापेटिका व जवळपास तितकीच स्लॅबवर्तुळे आढळली.

भगत यांच्या कार्याची नोंद भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने घेतली असून त्यासंबंधीच्या उत्खननाचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

या भागात मानवी वसाहतीचा सबळ पुरावा म्हणून लघुपाषाणाची हत्यारे, काळा, तांबडय़ा, करडय़ा रंगांची अभ्रकयुक्त खापरे व प्राचीन लोहभट्टीचे अवशेष आढळले आहेत.

यासोबतच मॅग्नेटाईट या लोहखनिजाचे अवजड चुंबकीय खडक सुद्धा सापडले आहेत. त्यामुळे ही लोहयुगीन काळातील दफनभूमी असण्याचा भक्कम पुरवा मिळतो.

यादिशेने अधिक संशोधनाची गरज असल्याचे मत अमित भगत यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 1:39 am

Web Title: ancient stone pillar found in bhandara district
Next Stories
1 मोदींकडून देशाच्या सुरक्षेशी खेळ – प्रकाश आंबेडकर
2 लैंगिक अत्याचार करून जतमध्ये तरुणीचा खून
3 कर्जाच्या वसुलीसाठी तरुणाला सिगारेटचे चटके, मारहाण
Just Now!
X